रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादवांनी हेच केले हाेते; कऱ्हाडात चर्चा

सचिन शिंदे
Thursday, 28 January 2021

सकाळी नऊ वाजल्यापासून मुख्याधिकारी रमाकांत डाके हे पालिकेत बसले होते. साडे नऊनंतर उशिरा येणाऱ्यांच्या नोंदी त्यांनी या वेळी ठेवल्या हाेत्या. त्यानूसार त्यांनी पुढील कार्यवाही केली.

कऱ्हाड : नवीन वर्षात पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेवर यावे, यासाठी सवय लावण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आजअखेर उशिरा येणाऱ्यांच्या पगारालाच कात्री लावत कारवाईचा बडगा उगारला. पाच विभाग प्रमुखांसह 25 कर्मचाऱ्यांचे अर्धे पगार श्री. डाके यांनी कपात केले. पालिकेत आजही (गुरुवार) उशिरा येणाऱ्यांवर कारवाई केली जाणार हाेती. दरम्यान श्री. डाके यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्याने आज (गुरुवार) पालिकेत सर्वजण कार्यालयीन वेळेपुर्वी आल्याचे निदर्शनास आले. 
 
पालिकेतील अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नससल्याने त्यांना वेळेत येण्याची सवय लावण्यासाठी मुख्याधिकारी डाके यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गांधीगिरीने स्वागतास सुरवात केली. पालिकेत उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वागत बॅंजोच्या गजरात व हारतुऱ्यांनी त्यांनी केले. पहिल्या दिवशी तब्बल 54, दोन दिवस सुटीनंतर 56 जणांचे पुष्पगुच्छ व वाद्यांच्या गजरात स्वागत झाले.

त्यावेळी उद्यापासून वेळ पाळण्याचेही काहींनी ठरविले. दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी उशिरा येणाऱ्यांची संख्या घटली. त्यावेळी मुख्याधिकारी डाके यांनीही त्यात शिथिलता देत उशिरा येण्याची कारणे पालिकेत टिपून घेण्याचे ठरवले. उशिरा येणाऱ्यांची कारणे विचारून त्यानुसार निर्णय घेण्यात येणार होता. ती कारणे पटली नाही तर त्यांच्यावर लेट शेरा मारून सलग तीन दिवस उशिरा येणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार होती. 

त्यानुसार सुटीच्या कालावधीनंतर बुधवारी पुन्हा पालिकेत लेटलतीफांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सकाळी नऊ वाजल्यापासून मुख्याधिकारी डाके येथे बसले होते. साडे नऊनंतर उशिरा येणाऱ्यांच्या नोंदी त्यांनी या वेळी ठेवल्या. सकाळी अकरानंतरही काही लेटलतीफ आले. त्यांच्या नोंदी ठेवण्यात आल्या. पाच विभागप्रमुखांसह 25 कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. त्यांच्या अर्धा रजा मांडून त्यालाच थेट कात्री लावण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना त्यांनीही अशा प्रकारेच मुंबईतील रेल्वे सेंट्रेल कार्यालयाच्या प्रवेशदारावर ठाण मांडून उशिरा येणा-या कर्मचा-यांची दखल घेतली हाेती याची आठवण आणि चर्चा पालिकेत नागरीकांच्यात सुरु हाेती. 

सातारा : कुळ कायद्यातील अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा

सातारा जिल्ह्यात 154 गावांत नळजोडणी पूर्ण; पाणीपुरवठाकडून 11 कोटींचा निधी खर्च

सकाळी सकाळी धायगुडे कुटुंबावर काळाचा घाला; दांपत्य ठार, सून जखमी

कोरेगावात पाण्याच्या फुगवट्याने रस्ता बंद; तालुक्‍यातील 125 शेतकऱ्यांची अडचण

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salary Cut Off Of Latecomer Employee In Karad Municipal Council Satara Marathi News