दिवाळी धमाक्यातच! साताऱ्यात आजपासून उडणार फटाका विक्रीचा बार

गिरीश चव्हाण
Wednesday, 11 November 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीत फटाके न वाजविण्याचे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले होते. शासनाच्या या आदेशानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये फटाक्‍यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शासनाचा स्पष्ट आदेश नसताना फटाके विक्री परवाने मिळत नसल्याने व्यावसायिक हवालदिल झाले होते.

सातारा : सोशल डिस्टन्ससह इतर आवश्‍यक त्या खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब करत येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर फटाका स्टॉल उभारण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. उद्यापासून फटाके विक्री सुरु होणार असल्याने फटाके विकण्यासाठी विक्रेत्यांना चार दिवसांचा अवधी मिळणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळीत फटाके न वाजविण्याचे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले होते. शासनाच्या या आदेशानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये फटाक्‍यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या आवाहनाचा आपल्या पध्दतीने अर्थ लावून घेत येथील विक्रेत्यांना सरसकट परवाने नाकारण्यात येवू लागले. शासनाचा स्पष्ट आदेश नसताना फटाके विक्री परवाने मिळत नसल्याने व्यावसायिक हवालदिल झाले होते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचे फटाके आणून ठेवले होते. या फटाक्‍यांचे करायचे काय, अशी चिंता या व्यावसायिकांना भेडसावत होती. यामुळे येथील फटाका स्टॉल असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. 

अण्णासाहेब पाटील संचालक मंडळ बरखास्त; नरेंद्र पाटलांना अशोक चव्हाणांवरची टीका भोवली

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने फटाका विक्रीबाबतच्या मार्गदर्शन सूचना शासनाकडून मागविल्या. या सूचना मिळाल्यानंतर येथील विक्रेत्यांना आजपासून फटाका विक्री परवान्यांचे वितरण सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली. नेहमीप्रमाणे या वेळीही फटाके विक्रीसाठी येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मागणीनुसार 25 स्टॉल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून त्याठिकाणी प्रत्यक्षात फटाका विक्री सुरु करण्यात येणार आहे. शासनाने उशिरा घेतलेल्या या निर्णयामुळे फटाके विक्रीसाठी आता व्यापाऱ्यांना फक्‍त चार दिवस मिळणार आहेत. या चार दिवसांत जास्तीत जास्त फटाके विकून अडकलेले भांडवल मोकळे करण्याची कसरत फटाका विक्रेत्यांना करावी लागणार आहे. 

नरकासुराने ठेवली आठ महिने मंदिरे बंद; बंडातात्यांचा ठाकरेंवर घणाघात

अशी घ्या खबरदारी 

  • मास्क, फेसशिल्डचा वापर आवश्‍यक 
  • सोशल डिस्टन्स राखण्याचे बंधन 
  • ग्राहकांना उभे राहण्यासाठी चौकोन आखा 
  • सॅनिटायझरसह इतर सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब गरजेचा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale Of Firecrackers In Satara From Today Satara News