यशवंतराव चव्हाण ज्या मातीत वाढले तेथेच माझा जन्म : संग्रामसिंह देशमुख

हेमंत पवार
Monday, 23 November 2020

संग्रामसिंह देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. संत गाडगे महाराज कॉलेजमध्ये त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मी रयत शिक्षण संस्थाचा विद्यार्थी आहे आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांचा पाईक आहे. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अण्णांनी आयुष्य खर्ची घातल्याचे त्यांनी सांगितले.

कऱ्हाड (जि. सातारा) : "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म ज्या मातीत झाला, त्याच मातीतील गुण माझ्यात आहेत. त्यांचे विचार आणि कार्यशैली माझ्या अंगी बाणावी म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे,'' अशा भावना पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी येथे व्यक्त केली.
 
येथे प्रीतिसंगमावर श्री. देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, कऱ्हाडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक घनश्‍याम पेंढारकर, भाजप महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्वाती पिसाळ, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पावसकर, कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कऱ्हाड शहर पदवीधर संयोजक प्रशांत कुलकर्णी, ऍड. दीपक थोरात, भालचंद्र देशमुख उपस्थित होते. 

राष्ट्रवादीचे काही आमदार अपक्षांसोबत; संग्रामसिंह देशमुखांचा गौप्यस्फोट

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, "आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. सुमारे 40 वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे काम त्यांनी केले. वैचारिक अधिष्ठान असलेले मुत्सद्दी नेतृत्व, विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी म्हणून त्यांचे गुण आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न राहील. आमच्या कडेगाव तालुक्‍यातील देवराष्ट्रे येथे त्यांचा जन्म झाला, त्याच मातीतले गुण नेहमी सोबत असतील. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असणारा पंचायत राज पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेला मिळाला. राज्यात प्रथम क्रमांक मिळवू शकलो याचा सार्थ अभिमान आहे.''

निष्क्रिय सरकारला पदवीधर निवडणुकीत जागा दाखवा; हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल

दरम्यान, संग्रामसिंह देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. संत गाडगे महाराज कॉलेजमध्ये त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मी रयत शिक्षण संस्थाचा विद्यार्थी आहे आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांचा पाईक आहे. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अण्णांनी आयुष्य खर्ची घातले. माझा राजकीय प्रवास तसाच सुरू झाला आणि अशा घटकांसाठीच मला काम करायचे आहे, अशा भावना त्यांनी तेथे व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचेही दर्शन घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangramsingh Deshmukh Visited The Samadhi Of Yashwantrao Chavan At Preetisangam At Karad Satara News