संतोष पोळने तीन खून माझ्यासमोर केले; ज्योती मांढरेची साक्ष

गिरीश चव्हाण
Sunday, 20 December 2020

शनिवारी झालेल्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

सातारा : सहा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संतोष पोळ याच्याविरोधातील खटल्याची शनिवारी (ता.19) सातारा येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान माफीचा साक्षीदार बनलेल्या ज्योती मांढरे हिने सहापैकी तीन खून पोळने माझ्यासमोर केल्याचा जबाब कामकाजादरम्यान न्यायालयात नोंदवला. या खटल्याची पुढील सुनावणी ता. दोन जानेवारीला होणार आहे.
लग्नानंतर दाेन वर्षांनी बसला ज्याेतीला धक्का
 
संतोष पोळ याच्याविरोधातील खून खटल्याचे कामकाज सातारा जिल्हा न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी शनिवारी संतोष पोळ याला न्यायालयात आणले होते. या कामकाजासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम हे सुद्धा उपस्थित होते.

Video : ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! सरपंच पेरे पाटलांचा संदेश वाचा 

कामकाजादरम्यान ज्योती मांढरे हिने मंगला जेधे, सलमा शेख, नथमल जैन यांचे खून पोळने माझ्यासमोर केल्याचे व खून करण्यासाठी इंजेक्‍शनचा वापर केल्याचे सांगितले. त्याने हे खून सोने आणि पैशासाठीच केले असून, मी संपर्कात येण्यापूर्वीच पोळने इतर तिघांचे खून केले होते. पोळच्या सांगण्यावरून मंगला जेधे यांना मी धोम येथील पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही मांढरे हिने जबाबात सांगितले आहे. यानंतर संशयित पोळचे वकील ऍड. श्रीकांत हुटगीकर यांनी मांढरे हिला काही प्रश्‍न विचारले. थोडावेळानंतर कामकाजाची वेळ संपल्याने न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. शनिवारी झालेल्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Pol Wai Dhom Killing Case Hearing Trending News