Satar : विडणीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp ncp congress

Satar : विडणीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये सामना

सांगवी : फलटण तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या विडणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने चुरस वाढली आहे. सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी चौरंगी तर सदस्यपदासाठी दुरंगी व एक अपक्ष अशी लढत होणार आहे.

फलटण तालुक्यातील सर्वांत मोठी असणारी विडणी ग्रामपंचायत निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. सरपंच व १७ सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी ९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने थेट सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. थेट सरपंचपदासाठी राष्ट्रवादी, भाजप, आम आदमी व अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे.

सदस्यपदासाठी ५३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १८ जणांनी उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यामुळे १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी व भाजप अशी सरळ दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दोनमधून एक अपक्ष उमेदवार असल्याने तेथे तिरंगी लढत होणार असल्याचे पाहायला मिळते. या निवडणुकीत युवकांना उमेदवारी देत नेत्यांनी संधी दिली आहे. थेट सरपंचपदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुरेश नाळे, भाजपतर्फे सागर अभंग, आम आदमीतर्फे अनिकेत नाळे व अपक्ष विठ्ठल पवार यांची उमेदवारी आहे.

राजकीय घडामोडी वाढल्या

विडणीत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल नाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ. उत्तमराव शेंडे यांचे चिरंजीव डॉ. किरण शेंडे व पुतण्या डॉ. रवी शेंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाचे पारड्यात राहतोय, हे पाहावे लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. आचारसंहितेचे पालन करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.