कोरोनामुक्त "या' शहरात पुन्हा आढळले 15 रुग्ण, प्रशासन सतर्क

राजेंद्र ननावरे
शनिवार, 4 जुलै 2020

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर 26 जून रोजी खंडोबानगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसह बाहेरून आलेले असे सात दिवसांत 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

मलकापूर (जि. सातारा) : कोरोनामुक्त झालेल्या मलकापुरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सहा दिवसांत 15 रुग्ण वाढल्याने शहरात तिसऱ्यांदा चार मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. 

रुग्णसंख्या वाढताच प्रशासनाने शहरात गर्दी होणारी ठिकाणे आगाशिवनगर, कोयना वसाहत येथील बसणारी भाजी मंडई बंद केली आहे. मलकापूर फाटा, ढेबेवाडी फाटा या परिसरातील फळ-भाजी विक्रेते यांना विक्री करण्यास करण्यास मनाई केली आहे. मलकापुरातील कोरोनाची पहिली साखळी खंडित करण्यासाठी पालिका व पोलिसांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत मलकापूरच्या नागरिकांनी चांगली साथ दिलेली होती. त्याचबरोबर पालिका व शासनाच्या जोडीला कृष्णा व सह्याद्री रुग्णालय प्रशासनाने मोलाचे योगदान दिले. त्यात 26 रुग्ण बरे झाले.

आता मुंबईहून आलेले पाच जण पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा हा काही परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करावा लागला. त्यामधे प्रभाग पाच, तीन व नऊमधील नवीन रुग्ण सापडलेली ठिकाणे कंटेन्मेंटमध्ये घेण्यात आली आहेत. या मायक्रो झोनमधील नियम कडक करून या भागात पूर्वीचाच मनाई आदेश लागू राहील. तर शहरातील उर्वरित भागात शासनाच्या सूचनेनुसार लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

26 एप्रिलला शहरातील सर्व रुग्ण बरे झाल्याने मलकापूर शहर कोरोनामुक्त व कंटेन्मेटमुक्त झाले होते. यादरम्यान कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाद्वारे शहरातील 60 वर्षावरील नागरिकांसह दहा वर्षाच्या आतील बालकांचा सर्व्हे करण्यात आला असून, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर 26 जून रोजी खंडोबानगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसह बाहेरून आलेले असे सात दिवसांत 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सध्या शहरात चार ठिकाणे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार केले असून, ते भाग पालिकेने बॅरिकेट लावून सील केले आहेत. 

कंटेन्मेंट झोन परिसरात पोलिस बंदोबस्त 

आगाशिवनगर, कोयना वसाहत येथील भाजी मंडई बंद. आरोग्य विभागाच्या वतीने 60 जणांचे श्राव पाठवले तपासणीला. पालिकेच्या वतीने 24 बाय 7 जनआरोग्य तपासणी अभियान. रुग्ण सापडलेले परिसर सनिटाइज. संपूर्ण शहरात फॉगिंग मशिनद्वारे फवारणी. चार कंटेन्मेंट झोन परिसरात पोलिस बंदोबस्त. मायक्रो झोनमधील नियम कडक. पूर्वीचाच मनाई आदेश लागू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara 15 Patients Found Again In The City Of Corona-Free, The Administration Alerted