वाईतील रुग्णालयांत 180 कृत्रिम ऑक्‍सिजनसह बेड वाढवणार : प्रांताधिकारी राजापूरकर

भद्रेश भाटे 
Wednesday, 16 September 2020

आमदार मकरंद पाटील यांनी प्रांताधिकारी राजापूरकर-चौगुले यांना या तीनही तालुक्‍यांचा आढावा घेऊन या ठिकाणी व्हेंटिलेटर बेड्‌स वाढविण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. 

वाई (जि. सातारा) : वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्‍यांमधील रुग्णालयांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या निधीतून 180 कृत्रिम ऑक्‍सिजनसह खाटा (बेडस) वाढविण्यात येणार आहेत. तसेच नव्याने तीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली. 

वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्‍यांमध्ये सध्या कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. या रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी प्रांताधिकारी राजापूरकर-चौगुले यांना या तीनही तालुक्‍यांचा आढावा घेऊन या ठिकाणी व्हेंटिलेटर बेड्‌स वाढविण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे प्रांताधिकारी राजापूरकर-चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये या तीनही तालुक्‍यांमध्ये 180 खाटा वाढतील, असे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाई 80, खंडाळा व महाबळेश्वरसाठी प्रत्येकी 50 खाटा वाढविण्यात येत आहेत.

वाई येथील ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून, ते मंगळवारपासून सुरू होत आहे. याठिकाणी सर्व अद्ययावत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. वाई तालुक्‍यात वाई ग्रामीण रुग्णालयाबरोबरच कवठे आरोग्य केंद्रातही कोविड सेंटर वाढविण्याच्यादृष्टीने अहवाल तयार करण्यात आला आहे. तेथेही कृत्रिम ऑक्‍सिजन पुरवठ्यासह 30 खाटा वाढविण्यात येणार आहेत. या तीनही तालुक्‍यांमध्ये आमदार निधीतून तीन रुग्णवाहिका, नव्याने उभारण्यात येणारे कोविड सेंटर व 100 जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहेत, अशी माहितीही राजापूरकर-चौधरी यांनी दिली.

जे रुग्ण घरच्या घरच्या विलगीकरणात आहेत, त्यांनी आजारपण वाढत असल्यास लपवून न ठेवता जवळच्या किंवा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना ताबडतोब त्याची माहिती देणे गरजेचे आहे. अनेकदा घरच्या विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण आजार लपवून ठेवत असून, तो वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयातील खाटा व कृत्रिम वायू उपलब्ध करून देण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी संबंधित रुग्णांनी ताबडतोबीने याची कल्पना आरोग्य अधिकाऱ्यांना देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वाई उपविभागात वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यांतील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी कोविड संसर्ग निपटण्यात येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करावी. त्यासाठी त्यांनी त्या भागातील तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही राजापूरकर-चौगुले यांनी केले आहे. 

""वाढत्या कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने हाती घेतलेले "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान अत्यंत जबाबदारीने जनतेपर्यंत पोचवायचे असल्याबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाली. शहरांसह पालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात ग्रामपंचायतस्तरावर हा उपक्रम राबविण्याचा आहे.'' 
-संगीता राजापूरकर-चौगुले, प्रांताधिकारी, वाई 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara 180 Artificial Oxygen Beds To Be Added In Wai Hospitals : Rajapurkar