
सायंकाळपर्यंत सातारा, कऱ्हाड व पाटण तालुक्यांत एकूण चार रुग्ण आढळले. कऱ्हाड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष, तामिनी (ता. पाटण) येथील सात वर्षीय मुलीचा त्यात समावेश आहे.
सातारा : जिल्ह्यात आज सायंकाळी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील प्रत्येकी एक व सातारा तालुक्यात दोन कोरोनाबाधित सापडले. त्यानंतर रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यात आणखी 26 बाधितांची भर पडल्याने दिवसभरात 30 कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 452 झाली. दिवसभरात आठ जण कोरोनामुक्त झाल्याची सुखद घटनाही घडली. गेल्या 24 तासांत 54 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले असून, 214 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या मालिकेत खंड काही पडत नाही. गेले आठवडाभरात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. काल (ता. 28) एकाच दिवसात 80 कोरोना बाधित सापडले. त्याचबरोबर पाच जणांचा मृत्यूही झाला होता. हा कोरोना मीटर आजही कायम राहिला. सायंकाळपर्यंत सातारा, कऱ्हाड व पाटण तालुक्यांत एकूण चार रुग्ण आढळले. कऱ्हाड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष, तामिनी (ता. पाटण) येथील सात वर्षीय मुलीचा त्यात समावेश आहे.
त्याचबरोबर परळी (ता. सातारा) येथील 21 वर्षीय युवक व 48 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या 54 वर्षीय पुरुषाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यात आणखी 26 कोरोनाबाधित सापडले. कऱ्हाड तालुक्यातील 12 व पाटण तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथील 8, वानरवाडीतील 3 रुग्ण, भरेवाडीतील एक बाधित आढळला.
पाटण तालुक्यात सळवे, सदुवर्पेवाडी, करपेवाडी व घाणबी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उर्वरित 10 रुग्णांपैकी फलटण तालुक्यातील सस्तेवाडी, जावळी तालुक्यातील आपटी व केळघरमधील प्रत्येकी एका, तर वाई तालुक्यातील जांभळीतील सात रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आज कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथील आठ जण कोरोनामुक्त झाले. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या 214 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील 13, कृष्णा हॉस्पिटलमधील 64, वाई ग्रामीण रुग्णालयातील 16, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 61, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 24, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 6 व शिरवळ येथील कोविड केअर सेंटरमधील 30 जणांचा समावेश आहे.
"सिव्हिल'मध्येही कोरोना चाचणी
कोरोना संशयितांची जास्तीतजास्त तपासण्या होण्यासाठी जिल्ह्यामध्ये तपासणी केंद्र होणे आवश्यक होते. त्यानुसार कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा कोरोना चाचणीला सुरुवात झाली. आता जिल्हा शासकीय रुग्णालातही Truenat Machine आणण्यात आले आहे. त्या मशिनद्वारे उद्यापासून कोरोनाची चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.