पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे हणबरवाडी योजनेला 40 कोटी निधी

Satara
Satara
Updated on

मसूर (जि. सातारा) : गेल्या 20 वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित धनगरवाडी-हणबरवाडी पाणीउपसा सिंचन योजनेतील हणबरवाडी योजनेला सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 40 कोटी निधी उपलब्ध झाल्याने आता ही योजना मार्गी लागणार आहे. उत्तरेतल्या दुष्काळी पट्ट्यातील गावांनी आजवर पाणीटंचाईची झळ सोसली होती. परिणामी हा भाग दुष्काळाने होरपळला होता. योजनेसंदर्भात बऱ्याच निवडणुकांच्या प्रचारात श्रेयवाद उफाळलेला होता. इतक्‍या वर्षांनंतरही योजनेचे पाणी ओंजळीत पडलेले नव्हते. 

सद्य:स्थितीत हणबरवाडी योजनेचे काम वेगाने सुरू आहे. या योजनेखाली येणाऱ्या 12 गावांमधील 2600 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यात रिसवड, अंतवडी, वडोली निळेश्वर, वाघेरी, बोरजाईमळा दरम्यान योजनेच्या पाइपलाइनचे काम गतीने सुरू आहे. ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. योजनेसाठी मार्च 2020 अर्थसंकल्पात 40 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. या योजनेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. 

गेल्या 20 वर्षांपासून हणबरवाडी-धनगरवाडी पाणीउपसा सिंचन योजनेसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी योजनेसाठीचा संकल्प मांडला होता. तेव्हापासून सहकारमंत्री पाटील यांचा या योजनेसाठीचा पाठपुरावा सुरू होता. या योजनेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांनी या योजनेचे गाजर दाखवले होते. योजनेसाठीचा निधी उपलब्ध केल्याबद्दलचा श्रेयवादही घेतला. योजनेसाठीचा निधी आपणच आणल्याचा छातीठोकपणे दावा सर्व पक्षांनी केला होता. निश्‍चित किती निधी उपलब्ध झाला, याबाबत अनभिज्ञता होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये योजना मार्गी लागल्याशिवाय आगामी विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी जनतेसमोर मते मागायला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर यांनी केली होती. शिवसेनेने या योजनेला निधी दिल्याचा आणि योजना शिवसेनाच पूर्ण करणार असल्याची डरकाळी फोडली होती. तर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी योजना पूर्ण करण्याचा विडाच उचलला होता. त्या अनुषंगाने योजनेतील हणबरवाडी योजनेला 40 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com