Satara : गैरव्यवहार झालेल्या संस्थांवर कारवाई करा;मंत्री अतुल सावे

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार
अतुल सावे
अतुल सावेsakal

सातारा : जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले आहे. याबाबतीत तक्रार प्राप्त होताच संबंधित संस्थांच्या संचालक मंडळाची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश सहकार व इतर बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्ह्यातील ओबीसी समाजातील मुला-मुलींसाठी साताऱ्यात वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे काम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सातारा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीनंतर मंत्री सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री सावे म्हणाले, ‘‘आज जिल्ह्यातील सहकार क्षेत्र व ओबीसीसंदर्भात विविध योजनांचा आढावा घेतला. हा आढावा घेत असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संबंधित विभागाच्या प्रमुखांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये पीककर्ज वाटप, त्याची रिकव्हरी अत्यंत चांगली आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेत जिल्ह्यातील तीन लाख ८५ हजार शेतकऱ्यांना प्रति ५० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आहे.

अत्यंत कमी शेतकऱ्यांना नावात चुका, थम इम्प्रेशन यासारख्या तांत्रिक कारणाने नुकसान भरपाई मिळाली नाही. या चुका दुरुस्त करून त्यांना भरपाईचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना केल्या आहेत.’’ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत राष्ट्रीयीकृत बँकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करून श्री. सावे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या सहकार परिषदेमध्ये केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी येत्या तीन ते साडेतीन वर्षांत देशातील सर्व सहकारी संस्था संगणीकृत कराव्यात, अशा सूचना केल्या आहेत.

सहकार क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा मानस आहे. सातारा जिल्ह्यातील ज्या बँका, पतसंस्था अडचणीत आहेत. त्यासंदर्भात संबंधित प्रशासक व उपनिबंधक यांना बैठका घेऊन संबंधित ठेवीदारांच्या ठेवी परत कशा देता येतील, यावर अधिक लक्ष देण्याची सूचना केल्या आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सावे म्हणाले, ‘‘आजच्या आढावा बैठकीत ज्या आश्रमशाळा व्यवस्थित चालत नाहीत, त्या संदर्भात शासनाने दिलेल्या सवलती त्यांना मिळतात की नाही, याची खातरजमा करण्याची अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. जिल्ह्यात ओबीसींच्या १०० मुली, मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जागा सुचवली आहे. या वसतिगृहासाठी मुलींसाठी ६० टक्के, तर मुलांसाठी ४० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून प्राप्त होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. ही बाब अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून देताच उदयनराजे भोसले यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कराड जनता’प्रकरणी उपनिबंधकांची चौकशी होणार

कराड जनता अर्बन बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी संबंधित बँकेच्या सर्व संचालकांसह जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांची ही चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com