शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी! चॉकलेटपेक्षाही स्वस्त झालाय कोबी

हेमंत पवार
Saturday, 20 February 2021

दोन किलोच्या कोबीचा गड्डा फक्त दोन रुपयांना द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : कमी कालावधीत जादा पैसे मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या, पालेभाज्यांच्या पिकाकडे वळले आहेत. मात्र, त्या पिकांचे दर आवक किती होते, यावर अवलंबून राहत आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे. उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या अंगावर असल्याने ते हवालदिल झाले आहेत. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोबी-फ्लॉवरची लागण मोठ्या प्रमाणात केली. त्यातून त्यांना चार पैसे जादाचे मिळतील अशी आशा होती. मात्र, त्यालउटच स्थिती झाली आहे. बाजारपेठेत कोबीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे कोबीला केवळ एक रुपये किलो एवढा दर मिळत आहे. दोन किलोच्या कोबीचा गड्डा फक्त दोन रुपयांना द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. मोठी मेहनत घेऊन केलेले कष्ट दर गडगडल्याने मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोबीसाठी घातलेले पैसेही निघत नाही. परिणामी त्यांचा खर्चही अंगावर फिरला आहे. 

हे पण वाचा- मोदीजी, 70 वर्षांत कॉंग्रेसनं काहीच नाही केलं; मग तुम्ही 7 वर्षांत काय केलं?; माजी मुख्यमंत्र्यांचा टोला

बाजारपेठेत दरच मिळत नसल्याने बाजारपेठेत कोबी नेऊन तरी काय उपयोग, असे म्हणत शेतकऱ्यांनी कोबी शेतातच ट्रॅक्‍टरच्या सहायाने बुजवण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी कोयत्याने तो तोडून जनावरांनाही खायला घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे. दरम्यान, कोबीचा दोन किलोचा गड्डा दोन रुपयांना विकावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने आता गावात मोफत कोबी वाटत आहे. आता राहिलेला कोबी शेतातच बुजवणार आहे, असे पार्ले येथील शेतकरी रविराज नलवडे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Agricultural News Cabbage Price Less Than Chocolate In Karad