
उत्तर कोरेगावातील ज्वारीला पुणे, सातारा, नगर येथून मोठ्या प्रमाणात मागणी असते.
वाठार स्टेशन (जि. सातारा) : उत्तर कोरेगाव हे ज्वारी पिकाचे आगार मानले जाते. या परिसरात दरवर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. यावर्षी हे पीक जोमात असून, ज्वारीला चांगला उतारा मिळण्याची आशा आहे.
उत्तर कोरेगावातील वातावरण हे जवळपास सर्व पिकांना पोषक असे आहे. या ठिकाणी स्ट्रॉबेरी, द्राक्ष, डाळींब या नगदी उत्पादनांसह इतर कोरडवाहू पिके घेतली जातात. परंतु, पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामात येथील शेतकरी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. या पिकाला कमी भांडवल लागत असून, धान्य आणि वर्षभर जनावरांच्या चाऱ्यासाठी हे पीक येथील शेतकऱ्यांना फायदेशीर पडते. सध्या येथील ज्वारी हुरड्याच्या स्थितीत असून, तीन ते
चार आठवड्यांत ज्वारी काढणी सुरू होईल.
कृष्णा कारखान्याची निवडणूक तातडीने घ्या; उच्च न्यायालयाचा राज्य प्राधिकरणास आदेश
येथील ज्वारीला पुणे, सातारा, नगर येथून मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा निघणारा कडबाही जनावरांना खाण्यास चविष्ट असल्याने सातारा जिल्ह्यासह शिरवळ भागातील शेतकरी येथील कडब्याला पसंती देतात. यावर्षी ज्वारीचे पीक चांगल्या स्थितीत असल्याने याला उतारा ही चांगला मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी ज्वारीबरोबर घेवड्याचेही पीक येथील शेतकऱ्यांनी घेतले आहे. वाळक्या घेवड्याला आता 90 ते 100 रुपये प्रति किलो असा भाव असून, ज्वारीलाही 35 ते 40 रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.
शाब्बास! गवंड्याच्या पोरीची सुवर्णपदकाला गवसणी; कर्नाटक राज्यात साताऱ्याची सोनाली प्रथम
सध्या जुन्या ज्वारीचे दर हे प्रति किलो 20 ते 25 रुपये असून, नव्या ज्वारीला प्रति किलो 35 ते 40 रुपयांचा भाव मिळण्याची शक्यता आहे.
-रेवणसिद्ध महाजन, व्यापारी, पिंपोडे बुद्रुक
संपादन : बाळकृष्ण मधाळे