...अन्‌ आमचं सारं गणितच बिघडलं!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरीही बाजारपेठा अजूनही सुरळीत सुरू झालेल्या दिसत नाहीत. बाजार भरवण्यास मनाई असल्याने शेतकऱ्यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गल्लोगल्ली जाऊन व्यापारी चढ्या दराने भाजीपाला विकत असले तरी शेतकऱ्यांना कमी दराज भाजी विकावी लागत आहे. कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतीचे सारे गणितच बिघडून गेले आहे. 

नागठाणे (जि. सातारा) : सद्यःस्थितीत कोसळलेले दर, रोपांची अनुपलब्धता, सतत बदलणारे हवामान आदी कारणांमुळे नव्याने होणारी भाजीपाला लागवड खोळंबली आहे. बाजारपेठाही अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. महत्त्वाच्या शहरांतील लॉकडाउन अजूनही कायम आहे. परिणामी भाजीपाल्याची मागणी वाढलेली नाही. या स्थितीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांपुढे प्रश्नच प्रश्न उभे आहेत. 

गेले तीन महिन्यांपासून शेतीचे सारे गणितच बदलून गेले आहे. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे सारे आडाखेच कोसळले आहेत. जिल्ह्यासह राज्याच्या पश्‍चिम भागात हेच चित्र प्रत्ययास येत आहे. महत्त्वाच्या बाजारपेठा एक तर बंद अथवा कमी क्षमतेने सुरू आहेत. मालाचा पुरेसा उठाव होईनासा झाला आहे. यामुळे या बाजारपेठांत दररोज शेकडो वाहने पाठविणाऱ्या गावांमध्येही गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे शांतता आहे. बाजारपेठा कधी बंद, तर कधी सुरू या खेळात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची दैना उडत आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे विदारक चित्र कायम आहे. सगळ्याच गोष्टी नकारात्मक घडत असल्याने भाजीपाला पट्ट्यात नव्या लागवडी खोळंबल्या आहेत. 

जिल्ह्यासह राज्याच्या पश्‍चिम भागातून भाजीपाला लागवडीसाठी रोपे जातात. पण, कोरोनाजन्य संकटामुळे भाजीपाल्याची रोपे तयार करणे अडचणीचे बनले आहे. रोपे तयार करण्यासाठी कच्चा माल वेळेत उपलब्ध होत नसल्याने रोपवाटिका चालकांनाही शेतकऱ्यांना आवश्‍यक त्या प्रमाणात रोपे तयार करून देणे कठीण होऊन बसले आहे. लॉकडाउनचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे. यामध्ये शेतकरीही भरडला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी झेंडू, टोमॅटो, कलिंगड, फ्लॉवर, कोबी, मिरची, पपई, वांगी, खरबूज आदी रोपे नर्सरीचालकांकडे थोडीशी रक्कम देऊन आरक्षित केली होती. मात्र, येत्या काळात पिकाला बाजारभाव मिळेल की नाही, या भीतीमुळे नोंद केलेल्या रोपांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी नर्सरीमध्ये रोपे पडून आहेत. ती रोपे फेकून देण्याची वेळ नर्सरीचालकांवर आली आहे. सध्या बाजारपेठच बंद असल्यामुळे नवीन लागवड करण्यास कोणी धजावत नाही. आता पुढची स्थिती काय असेल, याचा अंदाज येत नसल्याने शेतकरी रोपे घेऊन जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे नर्सरीचालकही आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे समस्याच समस्या उभ्या राहिल्या आहेत. 

 

सध्या शेतकरीवर्ग संकटात आहे. कोरोनाजन्य स्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच गेले दोन दिवसांपासून बदलत्या हवामानामुळेही परिस्थिती सतत बदलत आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे.' 

- अधिकराव देशमुख, शिवाजीनगर (ता.  सातारा) 

 

 

विद्यार्थी, पालकहाे वह्या, पुस्तक घेण्यापुर्वी हे वाचा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara ... And all our math went wrong!