Satara : नगरसेविकेवर हल्लाप्रकरणी एक जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

Satara : नगरसेविकेवर हल्लाप्रकरणी एक जेरबंद

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या भाजपच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर ता. ७ रोजी खुनी हल्ला करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गाडीला अडकवलेली पर्स, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे १९ हजार ८५० रुपयांचा ऐवज तिघांनी लुबाडला होता. त्यापैकी एका अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले.

दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मोक्याच्या गुन्ह्यातील फरारी असलेला व जबरी चोरीच्या गुन्ह्यात असलेल्या आणि पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी बापू कल्याण शिंदे (रा. सुरवडी, ता. फलटण) हा साखरवाडी गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच लोणंद पोलिस ठाणे व फलटण ग्रामीण पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत अट्टल गुन्हेगार बापू शिंदे यास शिताफीने ताब्यात घेतले. नगरसेविका तृप्ती घाडगे या ता. ७ रोजी त्यांच्या घाडगे मळ्यातील घरून निंबोडी रस्त्यावरील सेन्ट अॅन्स इंग्लिश मीडियम शाळेत मिटिंगसाठी दुचाकीवरून लोणंद- निंबोडी रस्त्यावरून जाताना सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना सुऱ्याचा धाक दाखवून त्यांची दुचाकी थांबवून त्यांच्या हातावर सुऱ्याचा वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गाडीला अडकवलेली पर्स, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे १९ हजार ८५० रुपयांचा ऐवज लुबाडून चोरटे पसार झाल्याची घटना घडली होती.

लोणंद, फलटण व खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या गंभीरघटना घडल्याने संशयितांचा तत्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानुसार लोणंद पोलिसठाण्याच्या हद्दीत ता. ७ रोजी जबरी चोरीचा घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिस कसून शोध घेत होते.

गुन्हा घडला त्या दिवसापासून पोलिसांनी घटनास्थळापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सुमारे ४७ किलोमीटर अंतरापर्यंत संशयिताचा माघ घेत व गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करत याद्वारे माहिती मिळवून संशयिताचा सहभाग या गुन्ह्यात निष्पन्न केला आहे.

कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, सागर अरगडे, अविनाश नलवडे, अतुल कुंभार, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजित काशीद, सागर धेंडे, सर्जेराव सूळ, फैय्याज शेख, बापूराव मदने, सिद्धेश्वर वाघमोडे, विठ्ठल काळे, अवधूत धुमाळ, अभिजित घनवट, विक्रम कुंभार, अविनाश शिंदे, केतन लाळगे, साहिल पवार, प्रमोद क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला.