Satara : लाखोंच्या उपस्थितीत बावधनचे बगाड उत्साहात Satara Bavadhan Bagad presence lakhs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bavdhan Bagad Yatra

Satara : लाखोंच्या उपस्थितीत बावधनचे बगाड उत्साहात

वाई : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. या वेळी ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’ गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता या मिरवणुकीचा प्रारंभ झाला.

बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी बगाड मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यापूर्वी बगाड्यास नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली.

त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाडाच्या भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी दगडी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस- चाळीस फुटाच्या उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान दिलीप शंकर दाभाडे (वय ६०, रा. बावधन) यांना मिळाला. एका वेळी दहा-बारा बैल जोड्यांच्या साह्याने हा रथ ओढण्यात येत होता.

ठराविक अंतरावर बैल बदलण्यात येत होते. त्यासाठी पंधराशे बैल शिवारातून उभे दिसत होते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभित करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. या वेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दर वर्षीप्रमाणे यात्रा नियोजन समिती कार्यरत होती. या समितीतील सदस्य बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपकावरून मार्गदर्शन व सूचना करीत होते. भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बगाड वाई- सातारा रस्त्यावर आले. या वेळी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी आठ वाजता बगाड गावात मंदिराजवळ पोचले. या वेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर आइस्क्रीम व शीतपेयाचे हातगाड्या उभ्या होत्या.

वाई- सातारा रस्त्यावर दुतर्फा हॉटेल व मिठाई व्यावसायिक, खेळणीवाले शीतपेयाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती. दर वर्षीप्रमाणे यावर्षीही बगाड पाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने भाविक भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात जिल्ह्याच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड पाहण्यासाठी आले होते. या वेळी भाविकांनी लगतच्या शिवारातील स्ट्रॉबेरी व हरभरा यांचा मनमुराद आस्वाद घेतला.

परिसरातील वाडीवस्तीवरील ग्रामस्थ त्यांचे पै- पाहुणे व नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे,

सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पवार सुधीर वाळुंज, स्नेहल सोमदे व १५ अधिकारी यांच्यासह ८५ पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दल आणि शीघ्र कृती दलाची एक तुकडी, महिला व वाहतूक पोलिस, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. बगाड मिरवणूक शांततेत पार पडली.

पोलिस अधीक्षकांचा सहभाग

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दुपारी चार वाजता सपत्निक बगाड मिरवणुकीत पारंपरिक वेशात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे व पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे उपस्थित होते.