Satara
Satara

मोठे दुदैव...इतिहासाचा साक्षीदार मोजतोय अखेरच्या घटका

पुसेसावळी (जि. सातारा) : महाराष्ट्राच्या इतिहासाचे सुवर्णपान म्हणून उदयास आलेल्या सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू पर्वातील एक निष्ठावान आणि पराक्रमी सेनानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फत्तेसिंह राजेभोसले यांच्या राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील राजवाड्याच्या भव्य बुरुजावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने तो ढासळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अडीचशे वर्षांपूर्वीचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतिहासप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ आणि इतिहासप्रेमींमधून बोलले जात आहे. 

इतिहासात शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणून फत्तेसिंह भोसले यांची ओळख आहे. त्यांच्याकडे अक्कलकोटची जहागिरी होती. सेनापती दाभाडे हे शाहू महाराजांना सोडून गेल्यानंतर त्यांचे जवळपास 720 गावचे वतन शाहू महाराजांनी फत्तेसिंह भोसले यांना दिले होते. 1733 दरम्यान जंजिरा मोहिमेवेळी फत्तेसिंहबाबा यांनी रायगड किल्ला हस्तगत करून पुन्हा स्वराज्यात आणल्याबद्दल शाहू महाराजांनी त्यांचे खूप कौतुक केले होते.

शाहू महाराजांच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी असणारे फत्तेसिंह भोसले यांची एक शाखा खटाव तालुक्‍यातील राजाचे कुर्ले येथील जहागिरी सांभाळत होती. या गावात त्यांनी बांधलेला भव्य राजवाडा (गढी) सध्या नामशेष झालेली असून, या गढीचे भव्य तीन बुरुज झाडी वाढल्याने ढासळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. अडीचशे वर्षांपूर्वीचे दगडी बांधकाम असणारे सुमारे 35 ते 40 फूट उंच आणि 40 फुटांचा व्यास असणारे हे भक्कम बुरुज म्हणजे मराठ्यांच्या सामर्थ्यशाली इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. राजवाड्याचे प्रवेशद्वार पडीक अवस्थेत आहे. मात्र, बुरुजावरील वाढलेली झाडे काढल्यास हा ऐतिहासिक ठेवा पुढील अनेक पिढ्यांना पाहावयास मिळणार आहे. 

राजाचे कुर्ले गावाशेजारी गिरिजाशंकर हे पर्यटनस्थळ असून, या ठिकाणी येणारे पर्यटक आणि इतिहासप्रेमी राजेभोसले यांच्या या ऐतिहासिक गढीला आवर्जून भेट देतात. मात्र, गढीच्या भव्य बुरुजांची अवस्था पाहून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होते. सातारा जिल्ह्यातील हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासन व इतिहासप्रेमींनी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 

जिल्ह्यातील संस्था, संघटनांनी पुढाकारा घ्यावा 

सध्या महाराष्ट्रात अनेक इतिहासप्रेमी संस्था, संघटना ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन करण्यासाठी अनेक युवक राबताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील हा अडीचशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी अशा संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजाचे कुर्ले ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com