
Satara : ब्रिटिशकालीन पुलाला धोका?
सातारा : भुयारी गटार योजनेच्या वाहिन्या टाकण्याच्या कामादरम्यान प्रतापगंज पेठेतील ब्रिटिशकालीन पुलाला निर्माण झालेला धोका तसाच ठेवत ठेकेदाराने काम पुढे रेटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट न करताच पडलेले भगदाड लोखंडी सळ्यांच्या मदतीने स्लॅब टाकून बुजविण्यात आल्याचे दिसून येते.
शहराच्या मध्यवर्ती भागातून अजिंक्यतारा, यवतेश्वर, तसेच पेढ्याचा भैरोबा डोंगरावरून आलेले अनेक ओढे आहेत. या ओढ्यांमुळे पूर्वी शहर परिसरातील भागांची विभागणी झाली होती. या विभागलेल्या भागांना जोडण्यासाठी राजघराण्याने पुढाकार घेत अनेक दगडी चिऱ्यातील पूल उभारले आहेत. याचबरोबर नंतरच्या ब्रिटिश राजवटीत देखील काही पूल उभारले. या पुलांमुळेच संपूर्ण शहर जोडले गेले. पालिकेच्या वतीने शहरांतर्गत भुयारी गटार योजना राबविण्यात येत असून, ते काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेसाठी मोती चौक ते बुधवार नाका या रस्त्याची खोदकाम करण्यात येत होते.
या मार्गावरील प्रतापगंज पेठेतील एमएसईबी ऑफिसजवळील ब्रिटिशकालीन पुलाच्या कमानीची खोदकामादरम्यान पडझड झाली. त्यानंतर पालिका प्रशासनाने त्याची पाहणी केली. पाहणीनंतर काम करणाऱ्या ठेकेदाराने पडलेले भगदाड लोखंडी सळ्यांच्या मदतीने स्लॅब टाकून बुजविले. ब्रिटिशकालीन पुलाच्या कमानीची चिरा खोदकामादरम्यान कोसळल्यानंतर त्या कमानीची, तसेच पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक होते. हा मार्ग आणि त्यावरील पुलामुळे प्रतापगंज, बुधवार पेठेसह मोळाचा ओढा, करंजे आदी भाग जोडला आहे. पुलाची पडझड झाल्याचे समजल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने त्याची पाहणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाहणी करताना कोणते निकष लावले, याची माहिती समोर आलेली नाही.