निवारा शेड बांधली; पण शौचालयाचे काय?

राजेश पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पाटण तालुक्‍यातील मराठवाडी धरणात यंदा पाणीसाठ्या वाढ करण्यात येणार असल्याने धरणाकाठच्या गावांतील धरणग्रस्तांना निवारा शेडमध्ये हलवण्यात येणार आहे. काहींना या शेडमध्ये संसारही थाटला आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने या ठिकाणी शौचालयाची व्यवस्थाच न केल्याने धरणग्रस्त नाराज आहेत. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणात यंदा पाणीसाठा वाढणार असल्याने धरणग्रस्तांसाठी शंभर निवारा शेडची तजवीज केलेली असली, तरी त्याला जोडून शौचालयांची व्यवस्था करण्यास मात्र पाटबंधारे विभाग विसरला आहे. 

मराठवाडी धरणात सुरवातीला काही वर्षे 0.60 टीएमसी पाणीसाठा होत होता. मात्र, गेल्या वर्षी सांडव्याचे बांधकाम सुरू केल्याने तो वाढून 1.05 झाल्याने अनेक मंदिरे, घरे, पाणीपुरवठ्याच्या विहिरी, स्मशानभूमी पाण्यात गेल्या. त्यामुळे भर पावसात निवारा शेडची उभारणी करून त्यामध्ये काही कुटुंबे हलवावी लागली. गेल्या वर्षी मराठवाडी धरणाची पाणीपातळी 643 मीटरवर होती. गेल्या काही महिन्यांत झालेल्या बांधकामामुळे या वर्षी पाणीपातळी तीन मीटरने वाढून 649.20 मीटरवर पोचणार असून, पाणीसाठा 1.4 टीएमसी होईल. पाणीसाठा वाढणार असल्याने पाटबंधारे विभागाकडून धरण परिसरात निवारा शेडची तजवीज करण्यात आलेली आहे. 

सुमारे 100 कुटुंबे राहू शकतील एवढी शेड उभारण्याचे नियोजन असून, उमरकांचन परिसरात सुमारे 60 कुटुंबांची व्यवस्था होईल एवढी शेड उभारण्याचे कामही पूर्ण झाले आहे. मेंढमध्ये मात्र या कामात फारशी गती दिसून येत नाही. यापूर्वी उभारलेल्या निवारा शेडबाबत आकार कमी, पावसाळ्यात पाण्याचे उमाळे फुटणे आदी तक्रारी होत्या. त्यामुळे यंदा नवीन शेड उभारताना त्यांचा आकार वाढविण्याबरोबरच जमिनीपासून उंच फाउंडेशन करणे, पायऱ्या बांधणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदणे आदी व्यवस्था केली आहे. 

निवारा शेडमध्ये वीजपुरवठा, तट्ट्यांचे पार्टिशन आदी सुविधा देताना संबंधित विभागाला शौचालयांच्या बांधकामाचा मात्र विसर पडल्याचे दिसून येत आहे. पाऊस वाढल्यावर धावपळ नको म्हणून अनेक कुटुंबांनी गेल्या महिन्यातच शेडमध्ये संसार हलविले आहेत. 

काही जण तिकडे राहण्यासही गेले आहेत. स्नानगृहे व शौचालयांची व्यवस्था करायला पाटबंधारे विभाग विसरल्याने धरणग्रस्तांसमोर ऐन वेळी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. काहींनी शेडात आडोसा करून स्नानगृहे तयार केली असली, तरी शौचालयांची गैरसोय कायमच आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शेड बांधकामावेळी शौचालयांची व्यवस्था केलेली नाही ही वस्तुस्थिती असली, तरी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

एरवी थंड असलेले महाबळेश्वर अचानक तापले, नेमकं काय झाले रात्री वाचा सविस्तर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Built a shelter shed; But what about the toilet?