पुसेगाव : बैलबाजार भरू न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

पुसेगाव : बैलबाजार भरू न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ

विसापूर : गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona virus) जास्त असल्याने पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणाऱ्या बैलबाजारावर प्रशासनाने बंदी घातली होती. यंदाही जातिवंत खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला पुसेगावचा बैलबाजार सलग दुसऱ्या वर्षी प्रशासनाने बंदी आणल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

पुसेगाव यात्रेतील बैलबाजार गावाच्या बाहेरील मोकळ्या जागेत भरतो. या बैलबाजारात शेतकरी, व्यापारी हजेरी लावतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता कमी असते आणि सुरक्षित सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन आपोआपच होते. त्यामुळे या बैलबाजाराच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील प्रशासनाने बैलबाजाराला परवानगी नाकारली आहे.

हेही वाचा: 'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन

पुसेगावच्या बैलबाजाराला ७० वर्षांची परंपरा आहे. राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी, व्यापारी खिल्लार बैल आणि पशुधनाच्या खरेदीसाठी येतात. परिणामी, यात्रा कालावधीत भरणाऱ्या या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बैलबाजार न भरल्याने शेतकऱ्यांना पशुधनाची खरेदी-विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. कित्येक शेतकऱ्यांची जातिवंत जनावरे दावणीला बांधून राहिल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. सद्य:स्थितीत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्याने यंदाच्या बाजारात जनावरांना चांगली किंमत येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, प्रशासनाकडून बैलबाजार भरू दिला जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: सातारा : जिल्ह्यात ८१७७ विद्यार्थ्यांना लसीकरण

बैलबाजाराला परवानगी देण्याची गरज

पुसेगावचा बैलबाजार भरणार, या आशेने काही शेतकरी व व्यापाऱ्यांनी औतकाम आणि बैलगाडी शर्यतीसाठी आवश्यक अशी खोंडे विक्रीसाठी आणली आहेत. पण, प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी पुसेगावच्‍या बैलबाजाराला परवानगी देण्याची गरज आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraCoronavirus
loading image
go to top