तुमच्या शेअर्सची परस्पर विक्री होत नाही ना? हे एकदा तपासाच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तुमच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणार असे सांगून ते परत आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शेळके त्यांच्या घरी गेला होता. सर्व व्यवहार मी केले आहेत, तुम्हाला जमेल तसे पैसे देतो, तक्रार करू नका असे त्याने सांगितले. परंतु, लेखी मागितल्यावर तसे दिले नाही. तसेच पैसेही दिले नाहीत. त्यामुळे नरगुंदे यांनी आज शेळके, व्यवस्थापक, व डिमॅट अकाउंटशी संबंधीत व्यवहार पाहणाऱ्या सर्वांविरूद्ध फिर्याद दिली.

सातारा : डिमॅट अकाउंटधारकाच्या खोट्या सह्या करून आणि अकौंटशी संलग्न मोबाईल क्रमांक बदलून विनासंमती सात हजार शेअर दुसऱ्याला गिफ्ट करत एका वृद्धाची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आयडीबीआय बॅंकेतील शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
डिमॅट अकाउंटचे व्यवहार पाहणारा रोहित शिवाजी शेळके (रा. शेळकेवाडी, ता. सातारा), शाखा व्यवस्थापक आणि सहीची शहानिशा करण्याचे अधिकार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांविरूद्ध दत्ता शामराव नरगुंदे (वय 70, रा. यादोगोपाळ पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. 

नरगुंदे यांच्या फिर्यादीनुसार, ते 1980 पासून त्यांनी शेअर खरेदी करण्यास सुरवात केली. सदरची खरेदी व विक्री ते ब्रोकरमार्फत करत होते. सुरवातीला त्यांचे व पत्नीचे अशी दोघांची संयुक्त खाती होती. पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी 2015 मध्ये त्यांनी स्वत:च्या खात्यावरून खरेदी सुरू केली. त्यांनी महाराष्ट्र स्कूटर, एशियन पेंटस, ब्ल्यू स्टार, सिपला, ग्रासीम, अल्ट्राटेक अशा विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते. 

जून 2018 मध्ये एनएसडीएलकडून आलेल्या स्टेटमेंटची पाहणी केल्यावर महाराष्ट्र स्कूटर कंपनीचे 80 शेअर्स कमी झाल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी आयडीबीआय बॅंकेत जावून डिमॅट अकाउंटचे व्यवहार पाहणारे शेळके तसेच शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करतो असे सांगितले. सप्टेंबर 2019 च्या स्टेटमेंटमध्ये एशिअन पेंटस कंपनीचे 150, ब्ल्यू स्टार कंपनीचे 300, सिपला कंपनीचे 3100 तसेच नोव्हेंबर 2019 मध्ये एशिअन पेंटसचे 160, सिपलाचे 600, ग्रासीमचे 80, महाराष्ट्र स्कूटरचे 60 व अल्ट्राटेक कंपनीचे 20 असे एकूण सात हजार शेअर्स कमी झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही ते बॅंकेत चकरा मारत राहिले. मी व्यवहार न करता शेअर्सची विक्री कशी झाली याबाबत त्यांनी विचारणा केली. 

या वेळी त्यांनी त्यांना प्रिंटींग मिस्टेक असेल, बॅंकेचे व्हर्जन बदलले आहे, थोडे थांबा, आम्ही चौकशी करतो, एनसडीएलची स्टेटमेंट खोटी येतात अशी कारणे सांगितली. दरम्यानच्या काळात त्यांनी शेळके याच्याकडे डिमॅट स्टेटमेंटची मागणी केली. त्याने व शाखा व्यवस्थापकाने मला प्रिंट काढून दिली. त्या स्टेटमेंटमध्ये माझे शेअर्स आहे तेवढेच दाखवत होते. त्यातून माझ्या शेअर्सची विक्री झाली नसल्याचे त्यांनी दाखविले. परंतु, शेअर्सचा डिव्हीडंट कमी येवू लागला. त्यामुळे मी पुन्हा शेळके व शाखा व्यवस्थापकाकडे गेलो. शेअर्सचा डिव्हीडंट का कमी येतोय असे त्यांना विचारले त्या वेळी त्यांनी मला एशियन पेंटस कंपनीकडे विचारणा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी कंपनीकडेही विचारणा केली. त्यांनी बॅंकेकडेच विचारणा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पुन्हा बॅंक गाठली. या वेळी त्यांनी डिमॅट खात्यावरील व्यवहारावेळी वापरण्यात आलेल्या डिमॅट स्लिपची मागणी केली. त्या पावत्यावरून त्यांना शेअर्स दुसऱ्याला गिफ्ट दिले असल्याचे समोर आले. 

फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तुमच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणार असे सांगून ते परत आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शेळके त्यांच्या घरी गेला होता. सर्व व्यवहार मी केले आहेत, तुम्हाला जमेल तसे पैसे देतो, तक्रार करू नका असे त्याने सांगितले. परंतु, लेखी मागितल्यावर तसे दिले नाही. तसेच पैसेही दिले नाहीत. त्यामुळे नरगुंदे यांनी आज शेळके, व्यवस्थापक, व डिमॅट अकाउंटशी संबंधीत व्यवहार पाहणाऱ्या सर्वांविरूद्ध फिर्याद दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Case Registered Against IDBI Bank Officer For Cheating