
सातारा : वाढदिवसाला धारदार शस्त्राने केक कापून स्टाइल मारण्याचा प्रकार मंगळवार पेठेतील सहा जणांच्या अंगलट आला आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पाच जणांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चार मोठे कोयते व तलवार असा घातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आदिल अस्लम शेख (वय 26), शादाब अय्याज पालकर (वय 20), मिजान निसार चौधरी (वय 30), तौसिफ अजिज कलाल (वय 26), शादाब अस्लम शेख (वय 25) व समर अस्लम शेख (सर्व रा. दस्तगीर कॉलनी, मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील समर शेख सोडून अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
वाढदिवसाला तलवार किंवा धारदारशस्त्राने केक कापून आपल्या गॅंगची दहशत माजविण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत. रस्त्यावर अशा प्रकारे घोळके जमवून रुबाब झाडणाऱ्यांवर आजवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, तरीही अशी कृत्य करण्याचे प्रकार काही थांबले नाहीत. साताऱ्यातील मंगळवार पेठेत असाच प्रकार करणारे मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत.
मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीमध्ये राहणाऱ्या आदिल अस्लम शेख याचा बुधवारी (ता. 10) वाढदिवस होता. त्या वेळी त्याने व त्याच्या मित्रांनी मोठ्या कोयत्याने केक कापून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतची माहिती सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल वायकर यांना माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. वायकर यांचे प्रयत्न सुरू होते. काल (ता. 16) वायकर यांना बातमीदाराकडून दस्तगीर कॉलनीमधील युवकाने व त्याच्या साथीदारांनी दशहत माजविल्याची व त्यांच्याकडे तलवारी व कोयते अशी घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे एक पथक तयार करून संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पथकाने बर्थ डे बॉयच्या सेलिब्रेशनच्या फोटोच्या आधारे त्याचा व त्याच्या साथीदारांचा शोध लावला. माहिती मिळाल्यानतर पोलिसांनी दस्तगीर कॉलनीत छापा टाकून आदिल व त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु पोलिसांनी प्रश्नाचा भडीमार करत कौशल्यपूर्ण तपास केला. त्या वेळी संशयितांनी त्यांच्याकडे घातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून चार मोठे कोयते व
तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्यावर आर्म ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हवालदार सुनील मोहरे तपास करत आहेत. सहायक निरीक्षक वायकर, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, राहुल चव्हाण व समीर मोरे या कारवाईत सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.