
ढेबेवाडी (जि. सातारा) : पाण्याखाली गेलेला जुना पूल आणि नवीन पुलाचे अंतिम टप्प्यातील रखडलेल्या बांधकामामुळे काढणेसह त्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांतील नागरिकांची कसरत सुरू आहे. नव्या पुलावर स्लॅब टाकण्यासाठी अंथरलेल्या लोखंडी जाळीवरूनच सध्या तेथे ये-जा सुरू असून तातडीने शिल्लक कामे मार्गी लावून वर्षानुवर्षांचा वनवास थांबवावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
काढणे गावाजवळचा वांग नदीवरील पूल कमी उंचीमुळे पावसाळ्यात अनेक दिवस पाण्याखाली असतो. काढणेसह तुपेवाडी, बागलवाडी, बौद्ध वस्ती, शिद्रुकवाडी, काजारवाडी, डुबलवाडी आदी वाड्या-वस्त्यांसाठी हा पूल उपयुक्त आहे. काढणे-खळे-मालदन हा परिसर रस्त्याने जोडलेला असून कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाला जोडणारा शॉर्टकट काढणेतून जात असल्याने त्या परिसरातीलही सुमारे दहा वाड्या-वस्त्यांतील नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होण्यासाठी नागरिकांतून सतत उंच पुलाची मागणी होत होती. गतवर्षी प्रिकास्ट आर्च प्रकारात पुलाचे बांधकाम सुुरू करण्यात आलेले असले तरी अद्याप ते पूर्ण झालेले नाही. पुलावर कॉंक्रिटचे तसेच त्याला दुतर्फा जोडणाऱ्या रस्त्याचे काम शिल्लक आहे. संततधार पावसामुळे सध्या जुना पूल पाण्याखाली गेल्याने नव्या पुलावर स्लॅबसाठी अंथरलेल्या लोखंडी जाळीवरूनच वाहन व पादचाऱ्यांची ये-जा सुरू आहे. उघड्या सळयांमुळे पायाला दुखापत होण्यासह वाहनांचे टायर पंक्चर होण्याचेही प्रकार घडत आहेत. शिल्लक कामे तातडीने मार्गी लावून वर्षानुवर्षांचा वनवास थांबवावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.