esakal | शेरे-पवारमळ्याला पावसावेळी वाहणाऱ्या ओढ्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

कृष्णा कालवा विभागाने ओढा प्रवाहित करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. मात्र, संबंधित विभाग केवळ आश्वासन देऊन त्यात चालढकलपणा करत आहे. 

शेरे-पवारमळ्याला पावसावेळी वाहणाऱ्या ओढ्याची भीती

sakal_logo
By
अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेरे येथील पवारमळ्याजवळून वाहणारा ओढा रहिवाशांच्या मनामध्ये काहूर माजवत आहे. जादा पावसावेळी त्यातील पाणी मळ्यातील घरांत घुसत असल्याने सर्वांची दैना होत आहे. यावर ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी प्रलंबित आहे. 

गेल्या पंधरवड्यातील मुसळधार पावसावेळी ओढा तुडुंब भरल्यानंतर तेथील लोकांच्या मनात भीती वाढली होती. ओढ्याचा प्रवाह कृष्णा कालव्याजवळ खंडित होतो. त्यामुळे पाण्यास फुगी येऊन पवारमळ्याचा परिसर जलमय होतो. याबाबत संबंधित कृष्णा कालवा विभागाने ओढा प्रवाहित करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. मात्र, संबंधित विभाग केवळ आश्वासन देऊन त्यात चालढकलपणा करत आहे. 

या ओढ्यास वडगाव हवेली येथील सिद्धेश्वर तलावातील पाण्याचा विसर्ग मिसळतो. त्याचबरोबर वडगावच्या शिवारातील पाणीही यात येऊन तो वाहतो. पूर्वेकडील कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या पश्‍चिमेकडील सर्व पाणी या ओढ्यात उतरते. इतक्‍या जास्त प्रमाणातील पाणी असणारा ओढा वाहत पवारमळ्याजवळ आल्यानंतर तिथे कृष्णा कालव्याजवळ तो खंडित होतो. त्यामुळे जादा पावसावेळी तो ओढा तुंबतो व त्यातील पाणी लगतच्या 70 एकर क्षेत्रात पसरते. त्याबरोबर सुमारे 200 लोकवस्तीतही ते पाणी शिरते. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

दरम्यान, कृष्णा कालवा विभागाने ओढा कालव्यात सोडण्यासाठी उपाययोजना करण्याची आम्हाला दोन वर्षांपूर्वी ग्वाही दिली आहे. संबंधित अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत. ओढा तांत्रिक बाबी अवलंबून कालव्यात घेतल्यास लोकांची समस्या संपेल, असे ग्रामस्थ हणमंतराव काळे यांनी सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

loading image
go to top