
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना हॉस्पिटलमध्ये कोणत्या रुग्णांना बेड द्यायचा याचे अधिकारी सध्यातरी त्या हॉस्पिटललाच आहेत. आपत्ती कायद्यानुसार प्रशासनाने आता संबंधित कोरोना हॉस्पिटलची बेड ताब्यात घेण्याची गरज आहे. तसे झाले तरच सामान्यांना बेड मिळणे सोयीस्कर होणार आहे. सध्याची स्थिती यापुढेही कायम राहिली तर बेड आणि उपचारावाचून सामान्यांची मृत्यू संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर ऍण्टीजेन टेस्टही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत मात्र शहरातील रुग्णालयांत तेवढ्या प्रमाणात बेडच उपलब्ध नाहीत. सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 400, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 75, एरम हॉस्पिटलमध्ये 61, श्री हॉस्पिटलमध्ये 40 बेड आणि पार्लेतील कोविड सेंटरमध्ये 200 रुग्णांची सोय होत आहे. मात्र, रुग्णसंख्या हजारात आणि बेड तोकडे अशी स्थिती आहे. त्यातच अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड न मिळाल्याने त्यातील काही रुग्णांना जीवासही मुकावे लागल्याचे उदाहरणे घडली आहेत.
अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बेड वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रशासनाला सूचित केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कऱ्हाड हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, श्री. हॉस्पिटल, सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेज, जैन समाजाची सेंटर, कऱ्हाड हॉस्पिटल, वारणा हॉटेल, यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी नवीन 635 बेड प्रस्तावित केले आहेत. मात्र, त्याला काही कालावधी लागणार आहे. मात्र, त्या दरम्यान पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध होत नाहीत.
सर्व हॉस्पिटलला चकरा मारूनही शेवटी घरीच आणून ऑक्सिजन मशिन शोधून आणून त्यांना तो लावावा लागत आहे. त्या दरम्यान त्यातील काहींचे मृत्यूही झाले आहेत. यासाठी हॉस्पिटलमधील बेडची सर्व यंत्रणा प्रशासनाने हाती घेण्याची गरज आहे. सर्व पॉझिटिव्ह रुग्ण पार्लेतील कोरोना सेंटरमध्ये ठेऊन तेथून बेड उपलब्ध होतील, तसे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे. सध्या कोणाला बेड द्यायचे हे हॉस्पिटलच ठरवत असल्याने सामान्यांची मात्र मोठी परवडच सुरू आहे. त्याचा विचार प्रशासनाने करून कार्यवाही करण्याची गरज आहे.
रोजच मिळावी बेडची माहिती
कऱ्हाडमधील हॉस्पिटलमध्ये बेड मिळवणे दिव्य होऊन बसले आहे. सध्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत, की नाहीत याची माहितीच मिळत नाही. रुग्ण हॉस्पिटलला घेऊन गेल्यावरच त्यांना तेथे बेड नसल्याचे सांगितले आत आहे. त्यासाठी सर्वांना त्याची माहिती मोबाईलवरच मिळाली, तर रुग्णांना घेऊन हॉस्पिटलच्या दारोदारी फिरण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी दररोज बेडची माहिती मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने करण्याची गरज आहे.
""कऱ्हाडची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन बेड वाढवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळावे, यासाठी केंद्रीय पद्धतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल.''
- उत्तम दिघे
प्रांताधिकारी, कऱ्हाड
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.