"कोरोना'मुळे कोंबडे शोधण्याची वेळ! गावोगावी चित्र

जालिंदर सत्रे
शुक्रवार, 10 जुलै 2020

 22 मार्चपासून कोरोना महामारीच्या लॉकडाउनमुळे आठवडा बाजार बंद आहेत. आठवडा बाजार बंद असल्याने आकाडीसाठी लागणारे कोंबडे बाजारात येत नाहीत. त्यामुळे आकाडीसाठी लागणारी कोंबडे ग्राहक गावागावांत फिरून खरेदी करीत आहेत. 
 

पाटण (जि. सातारा) : तालुक्‍यातील आकाडी परंपरेला यावर्षी कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे आठवडा बाजार बंद असल्याने आकाडीसाठी कोंबडे खरेदी-विक्रीची पंचायत झाली आहे. आठवडा बाजार बंद असल्याने आकाडी परंपरेतील देणंगतीसाठी ग्राहक कोंबडे शोधण्यासाठी गावभर फिरत असल्याचे चित्र तालुक्‍यात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आषाढ महिन्यात आठवडा बाजारात होणारी हजारो कोंबड्यांची खरेदी-विक्री व त्यामुळे होणारी लाखोंची उलाढाल यावर्षी ठप्प झाली आहे. 

आषाढ महिना म्हटले की आकाडी परंपरा अशी तालुक्‍याची एक वेगळी ओळख आहे. पाटण तालुक्‍यात ही परंपरा गेली अनेक वर्षे अखंडित सुरू आहे. अनेक देवदेवतांच्या वार्षिक देणंगती देण्याची प्रथा तालुक्‍यात संगणकीय युगातही टिकून आहे. काळा व खैरा कोंबडा, काळी तलंग आणि उफारट्या पखाचा कोंबडा असे कोंबड्यांचे प्रकार यावर त्याचा दर ठरत असतो. आकाडीसाठी प्रत्येक गावच्या ग्रामदेवतांवर व परंपरेवर कोणत्या प्रकारचा कोंबडा घ्यायचा, हे अवलंबून असते. त्या प्रमाणात त्याचे दर ठरतात. वरील प्रकारांपैकी ज्या प्रकाराला जास्त मागणी, त्याचे दर सर्वांत जास्त असतात. 

आकाडीची देणंगत अथवा त्यास वर्षातून एकवेळ देण्यात येणारी म्हणून त्यास वरसल असेही ग्रामीण भाषेत म्हणतात. मंगळवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवशीच ही देणंगत दिली जाते, अशी परंपरा असली तरी त्या परंपरेपाठीमागे काहीतरी शास्त्रीय आधार असावा. तालुक्‍यातील तारळे, पाटण, कोयना, चाफळ, ढेबेवाडी या गावांच्या आठवडा बाजारादिवशी आषाढ महिन्यात कोंबडी बाजार तेजीत असतो. दोन-चार तासांत हजारो कोंबड्यांची विक्री व लाखोंची उलाढाल आषाढ महिन्यातील आठवडा बाजारात होत होती. मात्र, 22 मार्चपासून कोरोना महामारीच्या लॉकडाउनमुळे आठवडा बाजार बंद आहेत. आठवडा बाजार बंद असल्याने आकाडीसाठी लागणारे कोंबडे बाजारात येत नाहीत. त्यामुळे आकाडीसाठी लागणारी कोंबडे ग्राहक गावागावांत फिरून खरेदी करीत आहेत. 

कोंबड्यासाठी लागताहेत 700 ते 800 रुपये 

गतवर्षी आठवडा बाजारात एका कोंबड्याला 500 ते 600 रुपये मोजले जात होते. मात्र, कोरोनामुळे 700 ते 800 रुपये एका कोंबड्याला मोजावे लागत आहेत. आठवडा बाजारात हक्काने व खात्रीशीर कोंबडे मिळत होते. परंतु, आता त्यासाठी शोधाशोध करण्याची वेळ "कोरोना'ने आणली आहे. 

संपादन  : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Corona Infection Causes Hens Not To Be Found For Akhadi Parties