कोरोनाने "उत्तम शेती'चा नारा पुन्हा बुलंद, लॉकडाउनमध्ये युवक राबताहेत शेतात

Satara
Satara
Updated on

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील युवक हाताला काम नसल्यामुळे वेळेचा सदुपयोग करत शेतात राबत आहेत. त्यामुळे "उत्तम शेती' चा नारा पुन्हा बुलंद होऊ लागल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. 

बाजारपेठा बंद असल्यामुळे सध्या शेतमालाला दर नाही. शहरी भागात जनजीवन ठप्प झाल्यामुळे गावाकडे लोकांचे लोंढे आलेत. चार-पाच दशकांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी जीवनमानाची साधी व्याख्या केली जायची. मात्र, अलीकडच्या काळात निसर्गाचा लहरीपणा, नव्वदच्या दशकानंतर सरकारचे शेती धोरण, मजुरांचा अभाव व वाढते दर, शेतमालाला खर्चाच्या तुलनेत कमी भाव, व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि पाण्याची अशाश्वती आदी बाबींमुळे शेती तोट्यात आली. परिणामी युवा पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन "निगेटिव्ह' झाला होता.

खेड्यातील बेरोजगार तरुणांनी कामधंदा, नोकरीसाठी शहराची वाट धरली. मात्र, गेल्या चार-पाच महिन्यांत जागतिक पातळीवर कोरोनाचे संकट आले आणि स्पर्धेच्या व धावपळीच्या युगाचे अर्थचक्र थांबले. लोकांना दोन पैसे मिळवून देणारी साधनं थंडावली. या प्रतिकूल परिस्थितीत सर्व जग थांबले असताना शेतकऱ्यांचा हात मात्र सतत कामात आहे. गावाकडे शेतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतीच तारू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. लॉकडाउनचा सकारात्मक उपयोग करत उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांनी बांध नवसारणे, पडीक जमीन लागवडीखाली आणणे, जमिनीची लेव्हलिंग, शेतात शेणखत टाकणे, पाइपलाइन, बांधांवरील अनावश्‍यक झाडेझुडपे काढून शेतीची चांगली मशागत केली. पडीक जमीन सुपीक केली. लॉकडाउनने सगळे उद्योगधंदे बंद असल्याने तरुण वर्ग शेतात काम करणाऱ्या घरच्या वडीलधाऱ्यांना हातभार लावताना पाहावयास मिळत आहे. 

सध्या कोरेगावच्या उत्तर भागात घेवडा, वाटाणा, सोयाबीन तर बागायती पिकामध्ये ऊस, आले, बटाट्याची लागवड झाली आहे. पिकातील तण काढण्यासाठी कोळपणी, भांगलणी तसेच कीटक व तणनाशक फवारणीला वेग आला आहे. अधिक उत्पादनासाठी टॉनिक, जैविके, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा डोस दिला जात आहे. या कामांत युवा वर्ग मग्न झाला आहे. कोरोनाने सर्वांना शेतीची वाट दाखवली आणि अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकंदरीत कोरोना आजाराने युवा वर्ग शेतीबाबत "पॉझिटिव्ह' झाल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. 


""मुंबईत छोटासा व्यवसाय आहे. पण, कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला आणि दुकानाला लॉक लागले. शेतकरी असल्याने गावी परतल्यापासून शेतात काम करत आहे. शेतात कष्ट करण्याने समाधान मिळत असून, मानसिक त्रास दूर होत आहे.'' 
-प्रदीप धुमाळ, सोनके, ता. कोरेगाव 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com