
ढेबेवाडी (जि. सातारा) ः परिसरातील गावांतून काही कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या निकट सहवासातील व्यक्ती या वैद्यकीय उपचार, खरेदी व अन्य कारणांनी येथील बाजारपेठेच्या संपर्कात आले. "त्याला काय होतंय, काढूया लॉकडाउनमधील बॅकलॉग भरून' असे म्हणत केलेला दांडगावा येथील व्यावसायिकांना महागात पडला आहे. ढेबेवाडी बाजारपेठेच्या मानगुटीवर कोरोना बसायला हीच बेशिस्त जबाबदारी ठरली आहे.
ढेबेवाडीजवळच्या बनपुरीत तीन महिन्यांपूर्वी कोरोनाने मुंबईमार्गे एन्ट्री केली. त्यानंतर आवश्यक उपाययोजनांमध्ये व्यापारी व नागरिक सारेच कमी पडल्याने कोरोनाने एका पाठोपाठ एक गाव गाठत आता संपूर्ण विभागात हात-पाय पसरले आहेत. आजअखेर परिसरात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 102 वर पोचला असून त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने काळजीचे वातावरण आहे. अनेक दुर्गम व डोंगराळ गावांची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या ढेबेवाडीत 15 दिवसांपूर्वी कोरोनाने एन्ट्री केली. आतापर्यंत येथे कोरोनाचे सात रुग्ण सापडले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला. येथील एका डॉक्टरांसह व्यावसायिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत दवाखाने, बॅंका, दुकानांसमोर लोक गर्दी करत होते. परिसरात सापडलेल्या काही कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री तपासल्यावर ते व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती ढेबेवाडी बाजारपेठेतील डॉक्टर व व्यावसायिकांच्या संपर्कात आल्याचे वेळोवेळी समोर आलेले असतानाही त्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने "आ बैल मुझे मार' अशीच येथील स्थिती झाली आहे.
सध्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येने येथील बाजारपेठ अस्वस्थ आहे. प्रवासाची हिस्ट्री नसणारेही बाधित आढळत असल्याने गाफीलपणाच नडल्याचे दिसत आहे. उशिरा का होईना जाग आलेल्या ढेबेवाडीकरांनी आता सावध पावले टाकायला सुरुवात केली असून पाच दिवसांपासून बाजारपेठ बंद ठेवली आहे. नियमावलीही कडक केली असली तरी त्याची अंमलबजावणी किती काळजीने होतेय, हे लवकरच समोर येईल.
आता व्यापाऱ्यांनी हे ठरवलंय...
* सर्व व्यावसायिकांची आरोग्य तपासणी
* तपासणी टाळणाऱ्यांचे व्यवसाय बंद
* संशयास्पद रुग्णांची कोरोना चाचणी
* सकाळी नऊ ते पाच या वेळेतच व्यवहार सुरू
* नियमभंग करणाऱ्याला दोन हजारांचा दंड
* संबंधितांचे दुकानही राहणार दोन दिवस बंद
* दुकानासमोर पाचच ग्राहक उभे राहणार
* सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आवश्यक
* ग्राहकाला मास्क नसल्यास व्यापाऱ्याला दंड
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.