कोरोनाने पसरले पाटण तालुकाभर हातपाय! तब्बल 93 गावांत शिरकाव

Satara
Satara

पाटण (जि. सातारा) : लॉकडाउनपासून साडेतीन महिने केवळ 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असणाऱ्या तालुक्‍यात एक जुलैपासून दीड महिन्याच्या आत 251 रुग्णांची भर पडली आहे. काही मर्यादित गावांपुरता असणारा कोरोना संपूर्ण तालुकाभर हातपाय पसरू लागला आहे. सामूहिक संसर्गामुळे एका दिवसात 15 ते 20 बाधित सापडत असल्याने प्रशासकीय यंत्रणेसह जनतेची चिंता वाढली आहे. 

जगभर हाहाकार माजविलेल्या कोरोना महामारीमुळे 22 मार्चपासून जनतेला लॉकडाउनला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या दीड महिन्यात डेरवणचा अपवाद सोडला तर मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होऊनसुद्धा तालुक्‍यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. मात्र, शासनाने एक मे पासून अटी शिथिल केल्या आणि बनपुरीत क्वारंटाइन केलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आणि तालुक्‍यात कोरोनाचा फैलाव सुरू झाला. बाधितांची संख्या 65 पर्यंत गेली होती. त्यापैकी 55 जण 12 जूनपर्यंत उपचार घेऊन घरीही गेले होते. 31 जूनपर्यंत पुन्हा 46 रुग्णांची भर पडली व एकूण बाधितांचा आकडा 101 वर पोचला. 

एक जुलैपासून कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला आणि दीड महिन्याच्या आत 251 बाधितांची भर पडली. एकूण बाधितांची संख्या 352 झाली असून त्यापैकी 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कऱ्हाड व सातारा येथील कोरोना सेंटरमध्ये सध्या 102 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तळमावले व पाटण येथील विलगीकरण कक्षात आजपर्यंत कोरोना रुग्णांच्या संपर्कातील 1400 च्या आसपास व्यक्तींवर उपचार केले आहेत. 
कोयना, पाटण शहर, नेरळे, आंब्रग, तारळे या गावांत जास्त रुग्ण सापडलेले पाहावयास मिळाले. मात्र, कोरोनाने 352 चा आकडा गाठताना तालुकाभर हातपाय पसरले आहेत. तालुक्‍यातील 93 गावांत कोरोनाचा शिरकाव झाला असून 51 गावांतील सर्व रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्याने अजून 42 गावांत निर्बंध पाहावयास मिळतात. काही दिवस तर 15-20 बाधित दररोज सापडत होते. कोरोनाचा वाढता सामूहिक संसर्ग प्रशासकीय यंत्रणेला व जनतेची चिंता वाढविणारा आहे. 


"एक गणपती'तून कोरोना फैलावणार तर नाही? 

काही दिवसांत गणेशोत्सवाची धामधूम सुरू होईल. अनेक गावांनी "एक गाव, एक गणपती'ची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, चार ते पाच गणेश मंडळांचे कार्यकर्ते "एक गाव, एक गणपती'मुळे एका ठिकाणी आरतीसाठी एकत्र येण्याची शक्‍यता आहे. त्यातून कोरोनाचा सामूहिक संसर्ग फैलावू नये यासाठी सामूहिक प्रयत्न झाले नाहीत तर मात्र कोरोनाचा तालुकाभर हाहाकार माजेल व त्यावर नियंत्रण करणे अवघड जाईल. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com