कोरोनाग्रस्त परिवारास मायेचा आधार!, मायणीत घरोघरी जाऊन केले जाते समुपदेशन

संजय जगताप 
Thursday, 17 September 2020

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुरमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मकरंद तोरो, चंदन वरुडे, रहिमतुल्ला शेख, मंगेश भिसे, सरफराज शेख, नागेश चौधरी, पोलिस पाटील प्रशांत कोळी एकत्र आले आहेत. भयग्रस्त कुटुंबीयांना आधार देण्यासाठी त्यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

मायणी (जि. सातारा) : कोरोनाबाधित झालेल्या, बळी पडलेल्या व्यक्तींच्या भयग्रस्त कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचा आदर्शवत उपक्रम येथे राबवला जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना मायेची ऊब व भक्कम आधार मिळून त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास हातभार लागत आहे. 

याबाबत माहिती अशी की, कोरोनाबाधित झालेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांपासून समाज चार हात दूर राहतो आहे. त्यांना समाजातून बहिष्कृत केल्यासारखे वागवले जात असल्याची काही उदाहरणे आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे भयग्रस्त झालेली आहेत. एका विशिष्ट दहशतीखाली त्यांना दैनंदिन जीवन व्यथित करावे लागत आहे. त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाहीत. देवाणघेवाण टाळली जात आहे. त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. बोलण्यापासून ते इतर सर्व व्यवहार टाळले जात आहेत.

संबंधितांनी फार मोठा गुन्हा केल्यासारखी वागणूक त्यांना दिली जात आहे. त्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे कोरोनाग्रस्त कुटुंबीय कमालीचे अस्वस्थ व हवालदिल झाले आहेत. त्यांना मानसिक आधाराची, गमावलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. हे ओळखून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुरमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मकरंद तोरो, चंदन वरुडे, रहिमतुल्ला शेख, मंगेश भिसे, सरफराज शेख, नागेश चौधरी, पोलिस पाटील प्रशांत कोळी एकत्र आले आहेत. भयग्रस्त कुटुंबीयांना आधार देण्यासाठी त्यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते सर्वजण येथील चांदणी चौकात एकत्रित येतात. कोरोनाग्रस्तांच्या घरी जातात. घराबाहेरच सुरक्षित अंतर ठेवून संवाद साधतात. सांत्वन करतात. कुटुंबीयांशी गप्पा मारून त्यांचे मन मोकळे करण्यास मदत करतात. प्रत्येकाशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार देतात.

आवश्‍यकतेनुसार मदतीचे आश्वासनही देतात. सर्वांगीण समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती दूर करतात. त्यामुळे एकाकी पडलेले, अनपेक्षित ओढवलेल्या परिस्थितीमुळे गांगरून गेलेले कुटुंबीय सावरण्यास मदत होत आहे. पुन्हा पूर्वपदावर येत दैनंदिन जीवन व्यथित करणे त्यांना सुलभ होत आहे. अशा प्रकारे दररोज किमान तीन ते चार कोरोनाग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या जात आहेत. संकटाच्या काळात लोकांना ज्या मानसिक आधाराची गरज आहे, ती गरज भागवण्याच्या त्या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. असे आधार देणारे संवेदनशील नागरिकांचे गट गावोगावी तयार होऊन भयग्रस्त लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. 

""कोरोनाग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना मानसिक आधाराबरोबर सर्वतोपरी मदत करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकीने लोकांनी काम करायला हवे.'' 
-प्रकाश सुरमुख, सामाजिक कार्यकर्ते, मायणी 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Counseling Of Corona Affected Family By Going Door To Door In Mayani