
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : जर्मनीत स्थायिक शुभांगी रोहन करांडे ही शेरे (ता. कऱ्हाड) गावची कन्या व त्यांचे पती रोहन राजाराम करांडे या दांपत्याने गावच्या देवीची यात्रा न करता त्या प्रथेला बगल देत शेऱ्यातील माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानला झाडे जगवणे व विकासाच्या उपयुक्त कामासाठी 50 हजार रुपये निधी देऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. देवीविषयी मनात श्रद्धा ठेवत या दोघांनी प्रथेसाठीचा खर्च वाचवून तो ग्रामनिधीसाठी दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब दामोदर निकम यांच्या शुभांगी या कन्या. शुभांगी व त्यांचे पती रोहन करांडे यांचे मूळ गाव शाळगाव (जि. सांगली) आहे. सध्या ते जर्मनीत स्थायिक आहेत. रोहन हे तेथील सरकारच्या संशोधन संस्थेत संशोधक आहेत, तर शुभांगी यांनी तेथील विद्यापीठातून नुकतीच एम. एस. पदवी संपादन केली आहे.
करांडे दांपत्याच्या मनामध्ये गेली अनेक वर्षे शेरे येथील प्रथेनुसार केली जाणारी ग्रामदेवीची यात्रा न करता तो खर्च चांगल्या कामासाठी द्यावा, हा विचार सतत घोळत होता. शुभांगी या माहेरी आल्यानंतर आपल्या नातलगांना हा विचार बोलूनही दाखवत होत्या. गेले वर्षभर शेरे येथे माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान राबवत असलेले ग्रामविकासाचे काम हे दांपत्य जवळून पाहत होते. याच धर्तीवर यात्रा न करता त्या खर्चातून मनापासून आवडणाऱ्या माऊली प्रतिष्ठानच्या कामाला साथ देण्याचा मानस या दांपत्याने आखला. तो त्यांनी प्रत्यक्षात नुकताच साकारत 50 हजार रुपयांचा निधी ग्रामविकास प्रतिष्ठानकडे सुपूर्द केला.
""ग्रामदेवीच्या यात्रेसाठी खर्च होणाऱ्या रकमेला अधिक महत्त्व दिले जाते. त्यातून गावजेवण देण्याची प्रथा आहे. पण, आपण हे करायचे नाही. मनातील श्रद्धा कमी न करता प्रथेऐवजी तोच खर्च चांगल्या कामासाठी देण्याचा विचार अनेक वर्षे सुरू होता. माऊली प्रतिष्ठानचे काम मनापासून आवडले व स्वखुशीने आम्ही निधी दिला आहे.''
-शुभांगी करांडे, जर्मनी
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.