esakal | राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा; स्फोटकांचा साठा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने (Satara District Anti-Terrorism Squad) बुधवारी रात्री आठच्या सुमारास तारळ्यातील राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल 103 किलोंच्या जिलेटीनच्या (gelatine sticks) स्फोटकांचा साठा जप्त केला. विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या कांड्याचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदसिंह राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याने अधिक माहिती मिळालेली नाही. satara crime news marathi latest tarale gelatine sticks

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रजपूत सहा वर्षांपासून तारळ्यात आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. विहीर खुदाईसाठी भागात ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवानाही आहे. त्याने भागात अनेक विहिरींच्या खुदाईसाठी ब्लास्टिंग केले आहे. ब्लास्टिंगचा परवाना असला, तरी जिलेटनचा साठा करण्याची परवानगी नाही, तरीही त्याने साठा केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना त्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस प्रताप पाटील, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड अशा वेगवेगळ्या पथकाने तारळ्यात थेट छापा टाकून कारवाई केली.

गोविंदसिंह याच्या घरावर पोलिसांचा छापा टाकला. त्या वेळी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र, साठा सापडला नाही. अखेर त्याच्या घरामागील न वापरले जाणारे स्वच्छतागृह पोलिसांनी तपासले. त्या वेळी तेथे जिलेटिनच्या स्फोटकांचा साठा सापडला. त्यांनी तो जप्त केला आहे. स्फोटकांचा साठा 103 किलोंचा आहे. साठा करण्याची परवानगी नसतानाही गोविंदसिंहने साठा केल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे साताऱ्याला रवाना केले आहे.

छाप्यामुळे भागात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईची भागात जोरात चर्चा आहे. जिलेटनच्या स्फोटकांचा साठा लॉकडाउनच्या काळात गोविंदसिंहने कोठून उपलब्ध केला, त्याचा पोलिस तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्यासह तपासाची प्रक्रिया सुरू असल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

हेही वाचा: लाॅकडाउन संपण्यास 3 दिवसांचा अवधी; जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

loading image