बस आरक्षणाच्या नावाखाली 58 हजारांचा गंडा; महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार

अभिजीत खुरासणे
Saturday, 16 January 2021

मेटगुताड (ता. महाबळेश्वर) येथील कल्पेश मंगलदास बावळेकर हा नोकरीनिमित्त मुंबईला राहतो. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी तो पत्नीसह गावी आला होता.

महाबळेश्वर (जि. सातारा) : ऑनलाइन व्यवहार करताना दाखविलेला निष्काळजीपणा एकाला चांगलाच महागात पडला आहे. ऐन संक्रांतीच्या दिवशी एकाने बस आरक्षणाच्या बहाण्याने जोडप्याला ऑनलाइनवरून तब्बल 58 हजार 200 रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिस तपास करीत आहेत.
 
मेटगुताड (ता. महाबळेश्वर) येथील कल्पेश मंगलदास बावळेकर हा नोकरीनिमित्त मुंबईला राहतो. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी तो पत्नीसह गावी आला होता. पुन्हा मुंबईला जाण्यासाठी बस आरक्षण करणे आवश्‍यक होते, म्हणून त्याने रेड बस या ऑनलाइन बस आरक्षण करणाऱ्या कंपनीला फोन लावला. कंपनीत फोन उचलणाऱ्या व्यक्तीने संभाषणानंतर कल्पेशला आपल्या मोबाइलमध्ये डेक्‍स ऍप्लिकेशन डाउनलोड करा, असे सांगितले. कल्पेशने त्या रेड बस कंपनीतील व्यक्तीने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या मोबाइलमध्ये डेक्‍स ऍप्लिकेशन डाउनलोड केले. 

कोरेगावात बस-दुचाकीच्या धडकेत सायगावचा युवक ठार; पोलिस गंभीर जखमी

डेक्‍स ऍप्लिकेशनमुळे कल्पेश यांची बॅंक खात्याची सर्व माहिती त्या व्यक्तीला मिळाली. त्याने कल्पेश यांच्या येस बॅंक खात्यातून परस्पर 1200 व त्यानंतर पुन्हा थेट 57 हजार रुपये लांबविले. असे एकूण 58 हजार 200 रुपये कल्पेश यांच्या बॅंक खात्यातून संबंधिताने लांबविले. या बॅंक खात्यातून काढलेल्या रकमेबाबत मोबाईलवर मॅसेज येताच रेड बस कंपनीतील व्यक्तीने आपली गोपनीय माहिती मिळवून बॅंक खात्यातून रक्कम काढून फसवणूक केल्याचे बावळेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची दखल घेऊन फसवणुकीबाबत सर्व माहिती सातारा येथील सायबर सेल कक्षाला दिली. सायबर सेल विभागाने ऑनलाइन चोरीचा तपास सुरू केल्याची माहिती महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी दिली.

आमच्या पोरीवर लाइन मारतोस; गोडोलीत युवकाला चोप; नऊ जणांवर गुन्हा

गोपनीय माहिती देऊ नका 

ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे, म्हणून प्रत्येक बॅंक आपल्या खातेदारांना ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करतात. आपली माहिती अनोळखी व्यक्तीला फोनवरून देऊ नका, असे वारंवार सांगत असते, तरीही काही जण ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घेत नसल्याने फसवणूक होते. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Online Fraud Of One Person In Mahabaleshwar