
कऱ्हाडमध्ये वर्चस्ववादातून गुंडाच्या टोळ्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. शहरासह तालुक्यात सुमारे अकरा गुन्हेगारी टोळ्या असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.
कऱ्हाड (जि. सातारा) : गुंडांच्या टोळीमुक्त कऱ्हाड शहर करण्यासाठी पोलिसांनी आराखडा तयार करून त्यासाठी पावले उचलली आहेत. शहरातील आणखी काही टोळ्यांवर तडीपारीसह अन्य कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी गुंडांच्या टोळ्यांच्या कुंडली जमा केल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी काल ही माहिती दिली.
कऱ्हाडमध्ये वर्चस्ववादातून गुंडाच्या टोळ्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. शहरासह तालुक्यात सुमारे अकरा गुन्हेगारी टोळ्या असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. काही टोळ्यांमधील गुन्हेगारी संपत आली आहे, तर अजूनही काही टोळ्या सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडून कारवाया सुरू आहेत. अलीकडे आकर्षणापोटी आणि भाई म्हणावे यासाठी महाविद्यालयीन तरुणही गुन्हेगारी टोळ्यांकडे वळत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवायातून हे वास्तव समोर आले आहे. किरकोळ कारणावरून वर्चस्ववादातून टोळ्या तयार होतात आणि त्यातून सातत्याने मारामारी सुरू राहते.
कृषीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मोदी सरकारला पळवाट : माजी मुख्यमंत्र्यांची टीका
मध्यंतरी शहरात टोळ्यांतील वर्चस्ववादातून खून, खुनी हल्ला, खंडणी, मारामारी अशा घटना घडल्या. त्यातून काही दिवस नागरिकांना वेठीस धरण्याचेही प्रकार घडले होते. त्यानंतर तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व सध्याचे उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी गुन्हेगारी टोळ्यांना टार्गेट केले. त्यातूनच मग काही दिवसांपूर्वी शहरातील सोळवंडे टोळी व शेख टोळीवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली, तर त्यानंतर आता अभिनंदन झेंडे टोळीला तडीपार करत गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अजूनही काही टोळ्यांच्या तडीपारीसाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी पोलिसांनी संबंधितांची कुंडली जमा केली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. गोडसे यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे