झिंगलेल्या झिंगाटांना कुणीतरी आवरा रे...महिंद धरणावर सेल्फीबहाद्दरांची वर्दळ

राजेश पाटील 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

धरणावर पूर्वीपासूनच सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने "आओ जाओ घर तुम्हारा' अशी स्थिती असून, दिवसभर अनेकजण धरणाच्या सांडव्यावर झिंगत झिंगाट डान्स करताना दिसतात. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : वांग नदीवरील महिंद धरण "ओव्हर फ्लो' झाल्याने अतिउत्साही सेल्फीबहाद्दरांची वर्दळ तिकडे वाढली आहे. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने "आओ जाओ घर तुम्हारा' अशी स्थिती असलेल्या धरणाच्या सांडव्यावर अनेक जण झिंगतच झिंगाट डान्स करताना दिसू लागल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती आहे. 

ढेबेवाडीपासून सुमारे दहा किलोमीटरवरील महिंद गावाजवळ बांधलेल्या धरणात 20 वर्षांपासून पाणी अडविण्यात येत आहे. प्रतिवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच धरण "ओव्हर फ्लो' होते. 85 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या महिंद धरणाचे पाणलोट क्षेत्र 35.98 चौरस किलोमीटरचे असून, 362 हेक्‍टर क्षेत्र त्यामुळे लागवडीखाली आलेले आहे. यावर्षी निसर्ग चक्रीवादळादरम्यान परिसरात पडलेल्या जोरदार पावसाने धरण भरायला बराच हातभार लावल्याने दरवर्षीच्या तुलनेत ते लवकर भरले आहे. धरणाच्या 104 मीटरच्या मुक्तपतन पद्धतीच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. धरणावर पूर्वीपासूनच सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने "आओ जाओ घर तुम्हारा' अशी स्थिती असून, दिवसभर अनेकजण धरणाच्या सांडव्यावर झिंगत झिंगाट डान्स करताना दिसतात. अलीकडे लॉकडाउनमुळे मुंबईसह बाहेरगावी राहणारे नागरिक गावी आले आहेत. अनेकजण विस्तीर्ण जलाशय व सांडव्यावरून कोसळणाऱ्या जलधारांचा आनंद घेण्यासाठी धरणावर येत आहेत. काहीजण दारूच्या बाटल्या, ग्लास व शिजविलेले मटण सोबत घेऊनच धरणावर येत असल्याने नशेत सेल्फी काढताना दुर्घटनेची शक्‍यता आहे. धरणस्थळावरील वाढत्या गर्दीने स्थानिक ग्रामस्थही हैराण असून "या झिंगलेल्या झिंगाटांना कुणीतरी आवरा रे...' अशीही मागणी जोर धरू लागली आहे. 

पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे 

महिंद धरणातील गाळाचा 20 वर्षांत उपसाच झालेला नाही. सांडव्याच्या भिंतीची अलीकडे मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष पाठपुराव्याने दोन वर्षांपूर्वी सांडव्याच्या जॅकेटिंगचे काम करण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम व्यावसायिक महेश पाटील यांनी मोठ्या कौशल्याने हे अवघड बांधकाम मार्गी लावत धरणाला मजबुती दिलेली असली तरी सतत पाण्याखाली राहिल्याने शेवाळलेल्या सांडव्यावरून पाय घसरून जलाशयात किंवा खाली खडकावर पडल्यास एखाद्याचा जीव जाण्याचीही भीती असल्याने संबंधित विभाग आणि पोलिस यंत्रणेने याप्रश्नी लक्ष घालावे. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, अशीही मागणी होत आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crowd Of Selfie Heroes On Mahinda Dam