वाईत उघड्यावर पीपीई किट्‌स टाकल्याने कोरोनाचा धोका

Satara
Satara
Updated on

वाई (जि. सातारा) : सोनापूर शेती येथील पालिकेच्या कचराडेपोसमोर हाकेच्या अंतरावर औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्य रस्त्याकडेला कोरोनाबाधित रुग्णसेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या दहापेक्षा अधिक पीपीई किट्‌सची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी सदरचे किट्‌स उघड्यावर टाकल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शहर व परिसरातील वैद्यकीय टाकाऊ कचरा सातारा येथील एजन्सी उचलून घेऊन जाते व त्याची योग्य विल्हेवाट लावते. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या उपचारात वापरण्यात येणारे किट्‌स रस्त्यावर टाकून त्या परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याने नागरिक परिसरातील डॉक्‍टरांच्या विरोधात रस्त्यावर उतरून जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी कालबाह्य औषधांचा कचराही अशा प्रकारे रस्त्यावर टाकण्यात आला होता. वारंवार असे प्रकार घडत आहेत.

परिसरातील डॉक्‍टर या गोष्टीला जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच ठिम्म प्रशासनसुध्दा या प्रकाराला जबाबदार आहे. अन्यथा त्या ठेकेदाराची हिम्मतच झाली नसती. डॉक्‍टर संगनमताने लोकांच्या जिवाशी खेळतात, हे फक्त ऐकले होते. परंतु, अशा पद्धतीने कालबाह्य औषधे रस्त्यावर टाकून स्वतःच्या पेशाची लक्तरे रस्त्यावर टांगण्यात आली आहेत. ही अतिशय गलिच्छ बाब आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याची चेष्टा केली असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत डॉक्‍टर असोसिएशनने त्वरित लक्ष घालून दोषींना पाठीशी न घालता योग्य ती कारवाई करावी. रस्त्याच्या बाजूला दहा किट्‌स टाकल्याने दोषींवर कारवाई करावी, यासाठी काही सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी पालिका प्रशासन, प्रांत व तहसीलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे समजते. 

""पालिकेच्या कचराडेपोसमोरील औद्योगिक वसाहतीच्या जागेत वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याची बाब गंभीर असून, संबंधित कचरा टाकणाऱ्यांवर धोकादायक कचरा 
कायदा 2016 नुसार संबंधित विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल.'' 

-विद्यादेवी पोळ, मुख्यधिकारी, वाई पालिका 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com