शेतकऱ्यांना खुशखबर : जिल्हा बँकेच्या कर्ज व्याजदरात कपात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

बॅंकेच्या अन्य कर्जाच्या योजनांवरही अर्धा ते दोन टक्‍यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचा फायदा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

सातारा : कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतकरी व ग्राहकांना आधार देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने व्याज दरात अर्धा ते दोन टक्क्‍यांने कपात केली आहे. त्याचा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या व्याजदर कपातीचा सभासदांना दिलासा मिळणार असला तरी बॅंकेवर याचा अंदाजे बारा कोटींचा बोजा पडणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. 

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात आज संचालक मंडाळाची बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या विविध निर्णयाची माहिती त्यांनी माहिती दिली. यावेळी सहकारमंत्री व तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थिती होते. 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्ह्यात द्राक्षबाग, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बॅंकेने या व्यवसायाला कर्जपुरवठा केला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी परतफेड केलेल्या वसूलपात्र हप्त्यावरील व्याजाचा परतावा देण्याचे धोरण घेतले असून त्यासाठी 50 लाखांची तरतूद केली आहे.

 'पगारदार कर्मचाऱ्यांना 35 लाखांपर्यंतचा विमा देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याचा फायदा बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे. सोनेतारण कर्जावरील व्याजदरात 1.25 टक्के कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दहा टक्के दराने सोने तारण कर्ज मिळेल. तसेच प्रति ग्रॅममागे 28 हजार 500 रुपये सोनेतारण कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.

व्याजदरात कपातीचा सभासदांना दिलासा मिळणार असला तरी बॅंकेवर याचा अंदाजे बारा कोटींचा बोजा पडणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आली. बॅंकेच्या अन्य कर्जाच्या योजनांवरही अर्धा ते दोन टक्‍यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचा फायदा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा जिल्हा बॅंकेचा पूर्वीपासून ग्राहक आहे. त्याला आकर्षक व्याजासह विम्याच्या विविध अन्य सवलती देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे असे ही त्यांनी सांगितले.
 
कर्जमाफ झालेले कर्जासाठी पात्र 
राज्य सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडील 42 हजार शेतकरी खातेदार पात्र ठरले असून त्यांना 224 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. यापैकी 35 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 184 कोटी जमा झाले आहेत. उर्वरित तिसऱ्या यादीतील शेतकरी खातेदारांवर कर्ज नाही असे गृहित धरुन पुढील कर्जासाठी त्यांना पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Dcc Bank Reduce Loan Interest Rates