esakal | सिव्हिलमधील डायलिसिस यंत्रणा सुरू; हजारो रुपये वाचणार
sakal

बोलून बातमी शोधा

सिव्हिलमधील डायलिसिस यंत्रणा सुरू; हजारो रुपये वाचणार


किडनीच्या रुग्णांच्या शरीरातील रक्ताची शुद्धी करण्यासाठी डायलिसिस हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. डायलेलिसची सुविधा ही किडनीच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. त्यामुळे बहुतांश रुग्ण हे डायलिसिस करत असतात. खासगी रुग्णालयात डायलिसिस करण्यासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो. त्याबरोबरच चार ते पाच डायलिसिसनंतर डायलिसिससाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च करावा लागतो.

सिव्हिलमधील डायलिसिस यंत्रणा सुरू; हजारो रुपये वाचणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : किडनीचा आजार असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारी डायलिसिस यंत्रणा तीन महिन्यांच्या खंडानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे गरीब, गरजू रुग्णांना उपचारासाठी सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड
कमी होणार आहे. त्याचबरोबर रुग्णांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे.
 
किडनीचा आजार असलेल्या एखाद्या रुग्णाला दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर डायलिसिस व किडनी प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा उपचार नाही. किडनी प्रत्यारोपण करणे हे फारच खर्चिक आहे. अशा रुग्णांना आवश्‍यक असलेली
किडनी दान करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्याचप्रमाणे योग्य मॅच असलेली किडनी मिळणेही जिकिरीचे असते. एवढ्या अडचणीतून किडनी मिळाली, तरी आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेकांना किडनी प्रत्यारोपण करता येत नाही. ज्येष्ठ
नागरिकांना अनेकदा ही शस्त्रक्रिया पेलणारी नसते. त्यामुळे त्यांच्यासमोरही शस्त्रक्रियेचा मार्ग उपलब्ध नसतो. 

त्यामुळे किडनीच्या रुग्णांच्या शरीरातील रक्ताची शुद्धी करण्यासाठी डायलिसिस हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. डायलेलिसची सुविधा ही किडनीच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. त्यामुळे बहुतांश रुग्ण हे डायलिसिस करत असतात. खासगी रुग्णालयात डायलिसिस करण्यासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो. त्याबरोबरच चार ते पाच डायलिसिसनंतर डायलिसिससाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. साधारणतः सुरुवातीला आठवड्यातून एकदा, नंतर दोन ते तीन वेळा रुग्णाला डायलिसिस करून घ्यावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णाच्या दृष्टीने हा खर्चही पेलणारा नसतो. त्यामुळे किडनीच्या आजार झालेल्या रुग्णाच्या कुटुंबासमोरच मोठे संकट निर्माण झालेले असते. 

जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या काळात जिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा सुरू झाली. सुरुवातीला दोन मशिन असलेल्या या विभागात सध्या सात मशिनच्या साहाय्याने रुग्णांचे डायलिसिस होते. त्यामध्ये अत्यंत कमी शुल्कामध्ये रुग्णावर डायलिसिसचे उपचार सुरू झाले होते; परंतु तीन महिन्यांपूर्वी या विभागातील छत कोसळले होते. तेव्हापासून डायलिसिस विभाग बंद होता. त्यामुळे जिल्ह्यातील या सुविधेची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांचे मोठे हाल होत होते; परंतु नूतनीकरणानंतर हा विभाग आता सुरू झाला आहे. या विभागातील सहा मशिन सध्या कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची सोय झाली आहे. 

साताऱ्यात एकच दिवस अजित पवार आले अन्...