esakal | कऱ्हाड सोसायटीतून बाळासाहेब की उदयसिंह?
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाड सोसायटीतून बाळासाहेब की उदयसिंह?

कऱ्हाड सोसायटीतून बाळासाहेब की उदयसिंह?

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस समोरच्या दाराने बॅंकेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण, मुळात हा मतदारसंघ (कै.) आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांचा (काकांचा) असून, त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी या मतदारसंघावर हक्क सांगत येथूनच संचालक होण्याची तयारी केली आहे. त्यानुसार त्यांनी सर्वाधिक ठराव केल्याचे सांगितले जात आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडूनही ॲड. उंडाळकरांना याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून पालकमंत्री की उंडाळकरांच्या सुपुत्राला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. आता ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. यावेळेस बॅंकेच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी कऱ्हाड सोसायटी मतदारसंघ ठरणार आहे. या मतदारसंघातून आजपर्यंत माजी आमदार व (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर संचालक होत होते. त्यांच्या निधनामुळे आता या मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह यांनी तयारी केली आहे. त्यांनी सर्वाधिक ठराव केल्याचे सांगितले जात आहे.

तर जिल्हा बॅंकेत समोरच्या दाराने प्रवेश करण्यासाठी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनीही कऱ्हाड सोसायटी मतदारसंघाचीच निवड केली आहे. त्यांनीही याच मतदारसंघातून ठराव केलेले आहेत. आजपर्यंतच्या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा या मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून येण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मागील वेळी त्यांना तज्‍ज्ञ संचालक म्हणून बॅंकेवर घेण्यात आले होते. आता यावेळची जिल्हा बॅंकेची निवडणूकच त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे ते ज्या मतदारसंघातून इच्छुक आहेत, तेथे त्यांना काँग्रेसच्याच उमेदवाराकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

सहकारमंत्र्यांना जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडून आणण्यासाठी सोसायटी मतदारसंघातून इच्छुक असलेल्या (कै.) विलासरावकाका उंडाळकरांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह यांना इतर मतदारसंघातून संधी दिली जाण्याची खेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी खरेदी-विक्री संघ आणि बॅंका व पतसंस्था मतदारसंघाचा पर्याय ॲड. उदयसिंह यांच्यापुढे ठेवला जाणार आहे. पण, याबाबतची कोणतीही चर्चा ॲड. उदयसिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून झालेली नाही. दुसऱ्या बाजूने कऱ्हाड सोसायटी हा आपला पारंपरिक मतदारसंघ असून, काँग्रेस पक्षानेही त्यांना याच मतदारसंघातून लढून संचालक व्हावे, असे सुचविले आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध येण्यासाठी यावेळेस काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह यांच्याशी चर्चा करून ‘कॉम्प्रमाईज’ करावे लागणार आहे. त्याला ॲड. उदयसिंह सकारात्मक राहणार का, यावर सर्व खेळ अवलंबून आहे. अन्यथा, या मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध ॲड. उदयसिंह पाटील असा सामना रंगणार आहे.

मतदारसंघनिहाय मतदारसंख्या...

  • कऱ्हाड सोसायटी : १४०

  • खरेदी-विक्री संघ : ११

  • नागरी बॅंका, पतसंस्था : ३७४

बाळासाहेब पाटील - ५८५७३

उदयसिंह पाटील- ११९५२

loading image
go to top