
Satara : पीक कर्ज वाटपात जिल्हा बॅंकेची आघाडी
सातारा : खरीप व रब्बीसाठी पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यातील बॅंकांना २८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सातारा जिल्हा बॅंकेला १७१२ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टाच्या १०१ टक्के म्हणजेच १७३४ कोटींचे कर्जवाटप बॅंकेने केले आहे. यामध्ये खरिपासाठी १२२३ कोटी. तर रब्बी पिकांसाठी ५१० कोटींचे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे जिल्हा बॅंक कृषी कर्ज वाटपात आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
सध्या सोसायट्यांकडून पीक कर्जाची वसुली सुरू असून, जुने खरीप कर्ज भरून घेऊन ते पुन्हा वितरित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जुने पीक कर्ज भरून शेतकरी आगामी खरीप हंगामासाठी पुन्हा पीक कर्ज घेणार आहे.
त्याचे वाटप ही सुरू झाले आहे. जिल्हा वार्षिक पत आराखड्यात सन २०२२-२३ करिता जिल्ह्यातील बॅंकांना पीक कर्ज वाटपासाठी २८०० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सर्वाधिक पीक कर्जवाटप हे जिल्हा बॅंकेकडून होते. त्यासाठी जिल्हा बॅंकेला ६१ टक्के म्हणजे १७१२ कोटींचे उद्दिष्ट होते.
त्यानुसार बॅंकेने खरिपासाठी १२२३, तर रब्बीसाठी ५१० कोटींचे असे एकूण पूर्तता १७३४ कोटींचे कर्ज वाटप पूर्ण केले आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाच्या १०२ टक्के कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टांहून अधिक वाटप करून जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे.
शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न
उद्दिष्टांहून अधिक वाटप करून जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सातारा जिल्हा बँक प्रयत्नशील आहे. कृषी व कृषिपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीचे उत्पादन वाढविणेसाठी शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे राहणीमान उंचावणेसाठी बँक नेहमीच प्रयत्नशील असते.