
सातारा जिल्हा बॅंकेची कर्जे स्वस्त
सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार यांना डोळ्यासमोर ठेऊन बॅंकेच्या थेट ४७ कर्ज योजना व सोसायट्यांमार्फत राबविल्या जाणाऱ्या ६८ कर्ज योजनांच्या व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. राज्यातील ३१ सहकारी बॅंकांमध्ये सगळ्यात कमी कर्ज व्याजदर देणारी बॅंक ठरली असून, राष्ट्रीयकृत बॅंकांच्या बरोबरीला आली आहे. हा निर्णय एक मेपासून वितरित होणाऱ्या नवीन कर्जांना लागू असून, या निर्णयामुळे बॅंकेवर १७ ते १८ कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. या वेळी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते, दत्तानाना ढमाळ, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, सुरेश सावंत, लहुराज जाधव, रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा बॅंक तब्बल सात लाखांवर कर्जदार सभासदांबरोबर वाटचाल करत असून, आर्थिक विकासाचे चक्र अधिक गतिमान करून समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन उद्याचा देशातील सर्वात प्रगतशील जिल्हा घडविण्याचा मानस बॅंकेने डोळ्यासमोर ठेऊन व्याज कपातीचा निर्णय घेतला आहे, असे सांगून श्री. पाटील व डॉ. सरकाळे म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेच्या थेट ४७ योजना व सोसायट्यांमार्फत ६८ योजनांतून कर्जपुरवठा केला जातो. बॅंकेचा मुख्य ग्राहक हा शेतकरी असून, त्यांना सुलभ व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देऊन विविध शेती व शेतीपूरक व्यवसायाची उभारणी करण्याच्या उद्देशाने बॅंकेच्या संचालक मंडळाने सर्व योजनांच्या माध्यमातून एक मे २०२२ पासूनच्या कर्ज वाटपावरील व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. फळबाग, फुलशेती लागवड, उपसा जलसिंचन, ठिबक, तुषार सिंचनसारख्या शेती उत्पादन वाढ करून देणाऱ्या उत्पादक कर्ज योजनांसाठी सभासदांना साडेदहा टक्के, तर शेतकरी निवास, सर्वसामान्य कर्ज योजनेसारख्या अनुत्पादक कर्जासाठी अकरा टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे.’’
क्षारपड जमीन सुधारणा, शैक्षणिक कर्ज, संकरित गाय, मुरा म्हैस, पंढरपुरी म्हैस, मांसासाठी देशी कुकुटपालन, इलेक्ट्रिक मोटार व पाइपलाइन, शेळीपालन, पोल्ट्री, शेत जमीन खरेदी, कृषी पर्यटन, जमीन सुधारणा, रेशीम उद्योग यांना बॅंक पातळीवर साडेआठ टक्के, तर संस्था पातळीवर साडेदहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. सामान्य कर्ज, दुचाकी वाहन कर्ज, सौर ऊर्जा सयंत्र खरेदी, ग्रामीण शौचालय, शेतकरी निवास दुरुस्ती, फ्लॅट, गाळा, प्लॉट खरेदी, आटा चक्की, चारचाकी वाहन कर्ज बॅंक पातळीवर नऊ टक्के, तर संस्था पातळीवर ११ टक्के व्याजदर असेल. साखर कारखान्यांना दिलेल्या कॅश क्रेडिट कर्जाची मार्च २०२२ अखेर ३० कोटींची येणे बाकी असून, यापूर्वी या कर्जाचा व्याजदर ११.५० टक्के होता. त्यामध्ये दीड टक्का कपात करून तो दहा टक्के केला आहे. मध्यम व दीर्घ मुदत कर्जासाठी दहा टक्के, बॅंकेच्या कर्जदार मार्केटिंग संस्था, ग्राहक संघ, प्रक्रिया संस्था व पाणी पुरवठा संस्था यांना भांडवलाकरिता कॅश क्रेडिट कर्जपुरवठा केला जातो. त्यासाठी कर्ज व्याजदरात दोन टक्के कपात करून तो दहा टक्के केला आहे. विकास सेवा सोसायट्यांना दहा टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. कर्जाच्या व्याजदरात कपात केली असली, तरी बॅंकेकडे असलेल्या ठेवींच्या व्याजदरात कोणतीही कपात केलेली नसल्याचे डॉ. सरकाळे यांनी सांगितले.
‘किसन वीर’चे भागभांडवल वाढवणार
किसन वीर साखर कारखाना अडचणीत असून, आता या कारखान्याचे भागभांडवल वाढविण्यासाठी शेअर्स डिपॉझिट वाढविण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष व ‘किसन वीर’चे संचालक नितीन पाटील यांनी सांगितले. त्यासाठी येत्या १२ तारखेला होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामध्ये ‘किसन वीर’च्या सभासदांची शेअर्स रक्कम वाढविण्यासाठी कर्ज देण्याबाबतचा निर्णयही चर्चा करून घेतला जाणार आहे.