नव्या आदेश वाचा, लग्नात लिंबू धरण्यास मामाही उपस्थित राहू शकणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

या सर्व आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळा करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग अधिनियम व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंड व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

सातारा : लग्न, अंत्यविधी व अन्य कार्यक्रमांसाठी आता केवळ 20 व्यक्तींनाच सोशल डिस्टन्सिंग पाळून सहभागी होता येईल. सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेर जाण्यास मनाई असेल. प्रवाशी असलेल्या कोणत्याही बसने कोणत्याही जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, असा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिला. दरम्यान, जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही अधिकाऱ्याने प्रवेश पास वितरित करू नयेत, अशी सक्त सूचनाही त्यांनी दिली आहे.
 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून 31 जुलैपर्यंत लॉकडाउनमधील नियम व अटींत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. जिल्ह्यातून अथवा परजिल्ह्यातून येणाऱ्या बसने जास्त क्षमतेने येणारे लोक, तसेच दुचाकी, तीन चाकी व चार चाकीतून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत.
 
लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया व अन्य कार्यक्रमास 50 ऐवजी आता केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीस परवानगी दिली आहे. लग्नविधीसाठी जिल्ह्याबाहेरील वधू-वर वगळून इतर व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रात लग्नासह अन्य इतर कोणतेही कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई असेल. प्रतिबंधात्मक क्षेत्रातून कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेर जाता येणार नाही. त्यातून वैद्यकीय सेवेशी निगडित व्यक्ती, रुग्ण व शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. जिल्हाबंदी असल्याने प्रवाशी असलेल्या कोणत्याही बसने मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांसह अन्य कोणत्याही जिल्ह्यांतून कोणत्याही कारणास्तव सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई असेल. सातारा जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस खासगी बसेमधून वाहतूक करणाऱ्या कोणालाही प्रवेश पास वितरित करू नयेत, अशी सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

या सर्व आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळा करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग अधिनियम व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंड व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

आदेशातील महत्त्वाचे... 

  •  दुचाकीवर एक प्रवाशी, तीन व चाकीवर तीन प्रवाशी 
  •  लग्नविधी, अंत्यविधीसाठी फक्त 20 व्यक्तींना परवानगी 
  •  लग्न समारंभासाठी अन्य जिल्ह्यांतील वधू-वरांनाच फक्त जिल्ह्यात प्रवेश 
  •  कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही कायर्क्रमास बाहेर जाण्यास मनाई 
  •  बाहेरच्या जिल्ह्यातून खासगी बसने सातारा जिल्ह्यात प्रवेश नाही 
  •  खासगी बसने बाहेरच्या जिल्ह्यात जाणे व येण्यासाठी पासेसला बंदी 
  • वधू-वरांचे आई-वडील, मामांचे काय?

    लग्नासाठी जिल्ह्याबाहेरील वधू व वर वगळून इतर व्यक्तींना उपस्थित राहण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. या आदेशामुळे वधू-वर, माता व पित्याने लग्न कार्यास उपस्थित राहायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, तसेच वधू व वराचा मामाही लग्न विधीत लिंबू धरण्यासही उपस्थित राहू शकणार नाही, मग लग्न नेमके होणार कसे, असा प्रश्‍न सर्व जण उपस्थित करू लागले आहेत.

काॅंग्रेसच्या माेठ्या नेत्याला घेरण्याची भाजपची खेळी 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Collector Issued New Order About Wedding Ceremony And Other Program