पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आला नवा आदेश; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त कार्यालयात पुणे विभागाच्या कोरोना प्रसाराचा आढावा घेतला. या वेळी नियमांची अंमलबजावणी कठोर होत नसल्यामुळे प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे समोर आले. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी
विशेषत: पोलिसांनी गांभीर्याने करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहे.

सातारा 6 : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाला पुन्हा ऍक्‍टिव्ह
मोडमध्ये यावे लागणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्त कार्यालयात पुणे विभागाच्या कोरोना प्रसाराचा आढावा घेतला. या वेळी नियमांची अंमलबजावणी कठोर होत नसल्यामुळे प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे समोर आले. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी
विशेषत: पोलिसांनी गांभीर्याने करण्याची सूचना आयुक्तांनी दिली आहेत.

त्यानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रात एकत्र येऊन गप्पा मारणारे, पत्ते खेळणारे, नागरिक एकत्र येऊन केला जाणारा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांवर कारवाई करणे, या क्षेत्रामध्ये जबाबदारी स्थानिक प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी नेमण्याबरोबर या क्षेत्रासाठी नियमांची अंमलबजावणीसाठीचा सहभाग वाढविण्यावर भर द्यायचा आहे. त्यासाठी या क्षेत्रासाठी कम्युनिटी लीडर नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रासह सर्व ठिकाणी पोलिसांमार्फत वाहनांची तपासणी करावी. त्यामध्ये अत्यावश्‍यक सेवांव्यतिरिक्त व कोणतेही सबळ कारण नसताना दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्यांवर कारवाई करायची आहे. इतकेच नव्हे तर, विनाकारण रस्त्यावर पायी फिरणाऱ्या युवकांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. 
दुकानांच्या संचलनाबाबतही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ उघड्या असणाऱ्या दुकानांवर कारवाई करून त्यांची परवानगीच रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शारीरिक अंतर न ठेवता दुकानामध्ये गर्दी झाल्यावर आता दुकानदाराबरोबरच ग्राहकांवरही कारवाई केली जाणार आहे.

त्याचबरोबर हॉटेलमध्ये पार्सल सुविधा उपलब्ध असतानाही गर्दी करणाऱ्या हॉटेल चालकासह तेथे गर्दी करणाऱ्या नागरिकांवरही कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. लग्न समारंभावेळी नियमांचे योग्य पालन न करणाऱ्या मंगल कार्यालय चालकांवरही गुन्हे दाखल करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. मात्र, या कारवाया कोरोना संसर्ग रोखण्याच्या मूळ हेतूने प्रामाणिकपणे करण्यात येत आहेत की नाही, याची पोलिस अधीक्षकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी दिले
आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता नियमांची अधिक कडक अंमलबजावणी होणार आहे. 

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी क्वॉरंटाईन; काेठे घडला हा प्रकार वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Divisional Commissioner Gave Instruction To SP Satara