पुरापासून असे करा घरांचे संरक्षण, रेठऱ्यातील आरिफ मुजावर यांचे संशोधन

अमोल जाधव
बुधवार, 1 जुलै 2020

आरिफ यांनी पेठवडगाव येथील अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून तेथेच  त्यांनी नावीन्याचा ध्यास बाळगत पुरावेळी होणारी हानी टाळण्यासाठी साध्या व सोप्या पद्धतींचा शोधनिबंध तयार केलेला आहे.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पुराच्या पाण्यापासून आपली घरे व दुकाने अगदी सोप्या पध्दतीने कशी वाचवता येतील, याबाबत येथील बांधकाम अभियंता आरिफ यासीन मुजावर यांनी संशोधनपर शोधनिबंध तयार केला आहे. हा शोधनिबंध आयआरजेईटी या आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. 

आरिफ यांनी पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण करून तेथेच पुढील पदव्युत्तर शिक्षण घेत त्यांनी नावीन्याचा ध्यास बाळगत पुरावेळी होणारी हानी टाळण्यासाठी साध्या व सोप्या पद्धतींचा शोधनिबंध तयार केलेला आहे. गेल्यावर्षी महापुरामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हाहाकार माजला होता. पुढील काळात अशा आपत्तीत गोरगरिबांचे नुकसान होवू नये, यासाठी त्यांच्या शोधनिबंधामधील उपाययोजना निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहेत. 

मुजावर यांनी सुचवलेल्या उपाययोजना अशा की, सर्वप्रथम आपल्या घरातील सांडपाणी व शौचालयाच्या पाइप पॅक करणे. नंतर पावसाचे पाणी गळू नये, म्हणून जो प्लॅस्टिक कागद छतावर टाकतो, त्या कागदाला घराची खिडकी व दाराजवळ खिडकी व दारापेक्षा दीड ते दोन फूट जादा कापणे. जेणेकरून जादा कापलेल्या भागाचे सर्व बाजूने फोल्डिंग म्हणजे रोल करता येईल. खिडकीला पॅक करणे, रोल केलेल्या भागावर लाकडी पट्ट्या स्क्रूने भिंतीवर किंवा फ्रेमवर फिट करावे. दाराच्या तळाचा भाग व्यवस्थितरित्या पॅक करणे व आवश्‍यकतेनुसार चिकट टेपचा वापर करावा. त्यावर सुद्धा लाकडी पट्टी स्क्रूने फिट करावी. कागद हा दार व खिडकी याला चिटकून बसेल अशा पद्धतीने लावणे. लाकडी पट्टीच्या खाली हीटलोन (एक प्रकारचे स्पंज) लावले तर अधिकची एअर टाईट होईल. 

रोगराईचे प्रमाण थांबवण्यास मदत 

सदरची उपाययोजना करूनसुद्धा घरातील आणि दुकानातील सर्व सामान काढावयाचे आहे. या सोप्या पद्धतीमुळे पुराचे पाणी घरात येऊन गेल्यानंतरची साफसफाई व रोगराईचे प्रमाण थांबवण्यास मदत होईल. ज्या ठिकाणी सर्व घरे किंवा दुकाने पाण्याखाली जात असल्यास त्याठिकाणी ही पद्धत उपयुक्त ठरणार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Do It From Flood protection of Houses