वाहनचालकांना तब्बल 50 लाखांचा दंड

हेमंत पवार
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे दुचाकीवरुन एक, तर तीन व चार चाकी वाहनातून तीन व्यक्तींनाच प्रवासाची मुभा आहे. गेल्या तीन महिन्यात हा नियम मोडून प्रवास करणाऱ्यांकडून वाहतूक शाखेने तब्बल 50 लाखांचा दंड वसूल केला आहे. 

कऱ्हाड (जि. सातारा) ः लॉकडाउनच्या काळात 21 मार्च ते 30 जूनअखेर शहर व परिसरात वाहतूक शाखेने 24 हजार 204 वाहनांवर कारवाई करून 50 लाख 12 हजार 700 रुपयांचा दंड जमा केला आहे. शहर वाहतूक शाखेचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी ही माहिती दिली. 

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाउनच्या काळात शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक बडवे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये 1 ते 11 जुलै दरम्यान पोलिसांच्या निर्देशाचे पालन न करण्याच्या 5 हजार 573 केसेस, विनापरवाना वाहन चालवण्यावर 31, ट्रीपल सीट 41, वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याच्या 70, नो पार्किंगच्या 179, फॅन्सी नंबर प्लेट व नंबर प्लेट नसणाऱ्यांच्या 135 व इतर अशा 7 हजार 188 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 14 लाख 91 हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचबरोबर शहर व परिसरात अनेकवेळा दागिने हिसकावून घेणे, मोबाईल लंपास करणारे गुन्हेगार हे फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबर प्लेट नसणारे वाहन वापरतात व अशी वाहने गुन्हा करताना वापरल्यामुळे अशा गुन्हेगारांचा शोध घेता येत नाही. असे गुन्हे रोखता यावे, यासाठी फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनचालकांकडून त्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट जागीच दुरुस्त करून वाहतूक शाखेने घेतल्या आहेत. शहरात वाहतुकीस अडथळा होईल किंवा नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आल्या आहेत. 

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे स्वतःचा व इतरांचा जीव धोक्‍यात घालतात. अशा संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. 

- विकास बडवे, सहायक पोलिस निरीक्षक, कऱ्हाड 

(संपादन ः संजय साळुंखे)

 

काय सांगता! नाही नाही म्हणता... 48 कोटी जमा झाले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Drivers fined Rs 50 lakh