दुष्काळी तरसवाडी आता पर्यटनाकडे!

अंकुश चव्हाण
मंगळवार, 30 जून 2020

खटाव तालुक्‍यातील दुष्काळी भागातील तरसवाडी हे गाव आता पर्यटन केंद्र होऊ लागले आहे. ग्रामस्थांच्या एकीतून झालेली जलसंधारणाची कामे, आजूबाजूला असलेली वनसंपदा, पवनचक्‍क्‍या आदी कारणांमुळे पुणे, मुंबईसह बाहेरगावचे पर्यटक तरसवाडीला भेट देत आहेत. 

कलेढोण : निसर्गरम्य डोंगररांगा, नागमोडी घाटवळण, पवनचक्‍क्‍या, मंदिरे, खोल दरीत साठलेले पाणी आणि डोंगरपायथ्यावर वसलेले जिल्हा सीमेवरील व दुष्काळी खटाव तालुक्‍यातील तरसवाडी हे गाव. गावकऱ्यांच्या एकीमुळे, जलसंधारण व वृक्षलागवडीत गावाने चांगलीच आघाडी घेतली. त्यामुळे डोंगररांगांत वन्यजीवांचा अधिवास वाढला असून गाव आता पर्यटनाकडे वाटचाल करीत आहे. 

खटावच्या पूर्व भागातील तरसवाडी हे गाव. येथील ग्रामस्थांना शासन टॅंकरने पाणीपुरवठा करत होते. मात्र, गत दोन वर्षांत झालेल्या गावच्या एकीमुळे गावच्या विकासासह पर्यटनाला चालना मिळाली आहे. एक गाव एक गणपती, जलसंधारणाच्या कामांमुळे गावचा चेहरामोहरा बदलून गेला. नागमोडी वळणाचा रस्ता, डोंगररांगांवर उभारलेल्या पवनचक्‍क्‍या, दरीत साठलेले पाणी, मंदिरे यामुळे शहरवासीय पर्यटनासाठी गावात दाखल होऊ लागले आहेत. वृक्षलागवडीमुळे डोंगररांगा हिरव्यागार होत असून वन्यप्राणी आश्रयास दाखल होत आहेत. त्यात सायाळ, रानडुकरे, उदमांजर, तरस, कोल्हे, लांडगे आदी वन्यजिवांचा समावेश आहे. गत आठवड्यात तर डोंगररांगांत एक हरीण ग्रामस्थांना पाहावयास मिळाले. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे येथील बंधारे, नाला बंडिंग पाण्याने तुडुंब भरल्याने गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ अनेक वाटसरू फोटोसेशनासाठी थांबताना दिसत आहेत. 

जलसंधारणाच्या कामामुळे तरसवाडीत पर्यटक दाखल होऊ लागलेत. ही सारी जलसंधारणाच्या कामाची किमया असल्याचे गावकरी सांगत आहेत. गावातील ओढे, बंधारे व तलाव पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून अनेक युवक फोटोसेशन करण्यासाठी गावकुसात मौजमजा करताना दिसत आहेत. 

एकजुटीमुळे गावात झालेल्या जलसंधारण व वृक्षलागवडीमुळे निसर्गसौंदर्यात भर पडली असून अनेक पर्यटक गावात दाखल होत आहेत. लवकरच हे गाव जगाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आणण्याचा मानस आहे. 

- अंकुश पवार, ग्रामस्थ, तरसवाडी 

 

चीनच्या राष्ट्रपतींना 19 वेळा भेटून मोदींनी काय साधले ?,पृथ्वीराज चव्हाणांचा टाेला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Drought Area Taraswadi Of Khatav Taluka Is Becoming Tourist Place