esakal | सततच्या पावसामुळे माणमध्ये कांदा गेला नासून
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्‍यात बिदाल, वावरहिरे, बिजवडी, येळेवाडी, राणंद, सोकासन, दहिवडी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागण केली. मात्र, सततच्या पावसाने उघडीपच न दिल्याने शेतातून पाणी निघाले नाही. परिणामी कांदा नासून गेला.

सततच्या पावसामुळे माणमध्ये कांदा गेला नासून

sakal_logo
By
विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी तीन महिन्यांच्या कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. आता कांद्याचे दर वाढत असताना सततच्या पावसामुळे कांदा नासून गेल्याने कांदाच शेतकऱ्याच्या हातात राहिला नाही. त्यामुळे केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात भर म्हणून कांदा बियाणांच्या दरातही विक्रमी वाढ झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 

माण तालुक्‍यात गेल्यावर्षी दहिवडी, वावरहिरे, राणंद, सोकासन, बिजवडी या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले होते. परंतु, दोन हजार ते अडीच हजार प्रति क्विंटल असलेला दर 600 ते 800 रुपयांवर येऊन ठेपला. दर घसरणीमुळे लागवडीचा खर्चदेखील निघत नव्हता म्हणून मोठ्या शेतकऱ्यांनी आपला कांदा ऐरणीत साठवून ठेवण्यात भर दिला. मात्र, तरीही दर मिळाला नाही. नाईलाजास्तव मिळेल त्या दराने कांदा द्यावा लागला.

पुन्हा एकदा जूनच्या सुरवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्‍यात बिदाल, वावरहिरे, बिजवडी, येळेवाडी, राणंद, सोकासन, दहिवडी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागण केली. मात्र, सततच्या पावसाने उघडीपच न दिल्याने शेतातून पाणी निघाले नाही. परिणामी कांदा नासून गेला. त्यामुळे निदान पाच महिन्याच्या कांद्याची तरी लागण यशस्वी व्हावी, यासाठी कांदा बियाणांची जास्त मागणी वाढली. मात्र, बियांण्यांचा तुटवडा जाणवू लागल्याने उपलब्ध बियाण्यांचे दर भरमसाट वाढले आहेत. दीड ते दोन हजार रुपयांचे दर तीन हजार ते साडेतीन हजार प्रतिकिलोवर गेले आहेत. तरीही यावर्षी कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने पुन्हा शेतकरी कांदा लागवडीकडे वळला. आज ना उद्या दर वाढेल या आशेने महागडे कांदा बियाणे शेतकरी खरेदी करून कांदा लागवड करताना दिसून येत आहेत. 

""तीन ते साडेतीन हजार रुपये देऊनही कांदा बियाणे मिळत नाहीत. बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे बियाण्यासाठी रोप टाकले असून, यंदा त्याचीच लागवड करावी लागणार आहे.'' 
-अर्जुन अवघडे, शेतकरी, वावरहिरे, ता. माण 

""जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने तीन महिन्यांच्या कांद्याची लागण केली होती. मात्र, त्यानंतर सतत पाऊस झाल्याने शेतातून पाणीच निघाले नाही. सर्व कांदा नासून गेला. नासलेला कांदा बांधावर टाकून द्यावा लागला. परिणामी केलेला खर्चही निघाला नाही.'' 
-कमल गुंजवटे, शेतकरी, 
बिदाल, ता. माण 

संपादन : पांडुरंग बर्गे  

loading image
go to top