या दुर्गम भागात लाॅकडाउनमध्येही "इच वन टीच वन'

रविकांत बेलाेशे
Monday, 3 August 2020

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले कांदाटी खोरे हा अतिशय दुर्गम भाग. या भागात आजही कसल्याही आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षणाचीही अशीच अवस्था आहे. ऑनलाइन शिक्षण सोडाच या भागातील मुलांना रोज शिक्षण देणेही जिकरीचे आहे. तरीही शिक्षकांचा लॉकडाउनमध्येही "इच वन टीच वन'च्या माध्यमातून शिक्षणाचा जागर सुरुच आहे. 

भिलार (जि. सातारा) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वर्क टू होम, ऑनलाइन शिक्षण आदी संकल्पना पुढे येत आहेत. पण, मोबाईल रेंजसह अपुऱ्या सुविधा असलेल्या कांदाटी खोऱ्यात मार्चपासून "इच वन टीच वन' उपक्रमांतर्गत शिक्षणयज्ञ सुरू आहे. दुर्गम गावागावांत जात विद्यार्थ्यांना एकत्र करून शिक्षक ज्ञानदान करत आहेत. या भागात ना रेंज, ना टीव्ही, ना सेटअप बॉक्‍स, ना कॉम्प्युटर, तरीही मार्चपासून शिक्षणात खंड पडलेला नाही. 

सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असून महाबळेश्वर तालुका हा जागतिक पातळीवर पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. याच तालुक्‍यातील पश्‍चिम भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. कोयना धरणाची सुरवात ज्या भागातून होते, त्याच्या उत्तरेला अति दुर्गम भागात कांदाटी नदीच्या एका बाजूला हा 105 गावांचा समावेश असणारा भाग आहे. या कांदाटी खोऱ्यात फक्त बीएसएनएल कंपनीची रेंज आणि तीही टूजी. सलोशी, पर्वत, उचाट, अकल्पेमुरा, अकल्पे, लामज मुरा आदी गावांतील शाळा वाघावळेच्या डोंगररांगांत आहे. ज्या भागात एकटा व्यक्ती जाण्यास घाबरतो, अशा भागातील शाळांमध्ये नवीन आलेले शिक्षण सेवक आणि अनुभवी शिक्षक कार्यरत आहेत. 

एकीकडे ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विविध योजना आकाराला येत असताना या भागातील शिक्षणाचं काय करायचं? असा ज्वलंत प्रश्न प्रदीप दाभाडे, डॉ. विजय सावंत, विनोद कुमठेकर, संतोष गायकवाड, बबन झरेकर, खाशाबा करणे, जयेश ठाकरे, नरेश भोये, दिलीप चौधरी, राजेश अहिरे, संदीप आवारी, दशरथ भांगरे आणि केंद्रप्रमुख प्रकाश भिलारे यांच्यासमोर होता. सर्वांनी कोरोना काळात या भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवायचा नाही, असा निर्णय घेतला. त्याला गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांचे पाठबळ मिळाले. शिक्षकांनी चार जणांचे गट केले व दिवसांची आणि गावांची विभागणी केली. चौघांनी मिळून रोज एका गावाला भेट द्यायची. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व खबरदारी घ्यायची, पालकांना विश्वासात घ्यायचं, मुलांना झाडाखाली एकत्र करायचं, विद्यार्थी विभागून घेऊन, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करत शिक्षण देण्याचं कार्य हे सर्व शिक्षक हिरीरीने करत आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप वाड्यावस्त्यांवर जाऊन केले. आतापर्यंत अभ्यासक्रमाचा 50 टक्के भाग शिकवून झालेला असून स्कॉलरशिप व नवोदय परीक्षांची तयारी सुरू केली आहे. 

"संकल्प शाळा' प्रगतीच्या वाटेवर 
रत्नागिरी जिल्ह्याची सीमा, सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्पाचे कोअर झोन असलेले वलवण-शिंदीतील 2019 साली बंद पडलेली शाळा "संकल्प शाळा' म्हणून पुन्हा सुरू करण्यात आली. ही शाळा वलवण, शिंदी, चकदेव, आरव, मोरणी आणि मोरणी पुनर्वसन या गावांतील मुलांसाठी सुरू झाली. शाळेत 10 विद्यार्थी दाखल झाले. डॉ. विजय सावंत यांनी यावर्षी शाळेचा पट 23 पर्यंत नेला असून मुंबई, पुण्यातील स्थानिक विद्यार्थीही दाखल झाले आहेत. 

कोरोनाचा बाऊ न करता कांदाटी खोऱ्यातील या शिक्षक वर्गाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. सर्व जण घरात बसून असतानाही या शिक्षकांनी घरापासून दूर दुर्गम भागात राहून आपल्या शिक्षकी पेशाला जागून सुरू केलेला शैक्षणिक जागर हा राज्याला दिशादर्शक आहे. 

- आनंद पळसे, गटशिक्षणाधिकारी 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग ही आहे तुमच्यासाठी गुड न्यूज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara "Each One Teach One" is also in the lockdown in this remote area