Gram Panchayat Election : गावकारभाऱ्यांसाठी ऐन थंडीत ‘इलेक्शन हिट’ माणमध्ये चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

Gram Panchayat Election : गावकारभाऱ्यांसाठी ऐन थंडीत ‘इलेक्शन हिट’ माणमध्ये चुरस

कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुकीचा जिल्ह्यातील सर्वांत मोठा टप्पा डिसेंबरमध्ये होत आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या जिल्ह्यातील ३१९ गावांत सुरू झाली आहे. गावची सत्ता आपल्याकडेच राहावी, यासाठी गावपुढाऱ्यांनी वर्षभरापासूनच फिल्‍डिंग लावली आहे. खुल्या गटासाठी सरपंचपद आरक्षित असलेल्या गावात मोठी चुरस होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर आली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीसाठी पॅनेलप्रमुखांचा कस लागत आहे. मात्र, गावा-गावांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला? यावरून पॅनेलप्रमुखांपुढेही पेच निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ऑक्टोबर २०२२ ते माहे डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ३१६ तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांतून वगळलेली एक व सन २०२१ मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे कार्यकारिणी गठित न झालेल्या दोन अशा ३१९ ग्रामपंचायातींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

जावळी तालुक्यातील १५, कऱ्हाड तालुक्यातील ४४, खंडाळा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील १५, कोरेगाव तालुक्यातील ५१, महाबळेश्वर तालुक्यातील सहा, माण तालुक्यातील ३०, पाटण तालुक्यातील ८६, फलटण तालुक्यातील २४, सातारा तालुक्यातील ३९ तर वाई तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. २० डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यासाठीची कार्यवाही सध्या प्रशासनाकडून सुरू आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या अपवाद वगळता पक्षीय चिन्हावर न होता गावपातळीवरील स्थानिक गटांतर्गतच होतात. त्यामुळे गावच्या निवडणुकीला शक्यतो पक्षांचा रंग नसतो. तरीही, राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीत त्यांचे भवितव्य ठरणार असल्याने ते लक्ष ठेवून असतात.

गावागावांत आणि घराघरांत जाऊन प्रचाराचा धुरळा ग्रामपंचायत निवडणुकीत उडतो. सत्तेसाठी गावातील एका-एका मतालाही महत्त्‍व असते. त्यामुळे गावपुढाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. गावची सत्ता आपल्या ताब्यात असावी, यासाठी अनेक जण इच्छुक असतात. गावात केलेल्या विकासकामांचा मुद्दा घेऊन सत्ताधारी प्रचारात दरवेळी उतरतात.

मात्र, गावचा कारभार करताना तो कसा चुकला आहे, हे विरोधकांकडून जाहीर सभेत सांगितले जाते. त्यामुळे गावोगावच्या प्रचारात चांगलीच रंगत येते. मात्र, गावची सत्ता कोणाला द्यायची ? याचा कल हा मतदार राजावर अवलंबून आहे. इच्छुकांना गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मतदार राजाला खुश करण्यासह त्यांचे मन वळवण्यासाठीही अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत. खुल्या गटातील सरपंचपद आरक्षित असलेल्या गावांत मोठी चुरस होणार आहे. अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने तेथे एका-एका मतासाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे.

थेट सरपंचपदामुळे वाढणार सदस्य... ग्रामपंचायतीत यापूर्वी निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचांची निवड केली जात होती. त्याला ब्रेक देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारने सरपंचपद हे थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सरपंचांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे आता निवडणूक लागलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येव्यतिरिक्त आणखी एक सदस्य वाढणार आहे. त्यामुळे सदस्यांची संख्याही वाढणार आहे.

युवा इच्छुकांची भाऊगर्दी

गावच्या ग्रामपंचायतीचे आपणही सदस्य असावे, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. गावातील छोटे-मोठे कार्यक्रम, काही सामाजिक कामे, या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून त्यांनी चांगलीच मेहनत घेऊन तयारी केल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. त्यामुळे यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत जुन्या जाणकार सदस्यांसह नवीन तरुण सदस्यांची संख्याही जास्त असणार आहे.