...अखेर "ही' पालिका झाली कोरोनामुक्त, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Satara
Satara
Updated on

मलकापूर (जि. सातारा)  : तब्बल 32 दिवस आरोग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या संघर्षानंतर मलकापूर शहर कोरोनामुक्त झाले, तर तब्बल दोन महिन्यांनंतर शहराच्या काही भागात असणारा कंटेनमेंट झोन काढण्यात आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

मलकापुरात 21 एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. आरोग्य विभाग, प्रशासन व नागरिकांची दमछाक झाली. संपूर्ण शहर सॅनिटायझिंग करून झाले. आरोग्य विभागाने एक नव्हे तर तीन वेळा सर्व्हे केले. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस काम केले. पालिकेने सर्व कॉलन्या सील केल्या. नागरिकांनीही पुरेपूर काळजी घेतली. सर्व प्रयत्न करून झाले. मात्र, साखळी तुटता तुटत नव्हती. त्यामध्ये आगाशिवनगर आणि अहल्यानगर या भागात कोरोनाने थैमान घातले. तब्बल 26 रुग्ण या भागात मिळून आले तर संपूर्ण शहरांमध्ये 31 सापडले. 

आता सर्व प्रयत्नांनंतर मलकापूर कोरोनामुक्त झाले. मात्र, कोरोनाची दहशत कायम आहे. शहरातील व्यवहार अतिशय थंडपणे सुरू आहेत. व्यवसाय दबकत-दबकत सुरू केले जात आहेत. अजूनही शहरामध्ये सर्व दुकाने उघडलेली नाहीत. शासनाच्या आदेशाप्रमाणे दुकाने वेळेत सुरू व बंद होत आहेत. कोरोनाचे संकट दूर झाले असले तरीही पालिकेने आपले काम सुरूच ठेवले आहे. त्यामध्ये स्वच्छता, सॅनिटायझर फवारणी केली जात आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांची थर्मल तपासणी केली जात आहे. सध्या शहरातील 60 वर्षांवरील दोन हजार 713 वयोवृद्ध व दहा वर्षांच्या आतील तीन हजार 615 बालकांचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, अस्थमा, क्षयरोग, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा, कर्करोग, गर्भवती स्त्रियांना विशेष वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे 21 मे 2020 रोजीच्या सभेमध्ये प्रभागनिहाय समित्या स्थापन केल्या असून, या समितीचे अध्यक्ष संबंधित प्रभागातील नगरसेवक व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, याद्वारे संबंधित वयोवृध्द नागरिक व बालकांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. 

पालिकेने भारती विद्यापीठ व आगाशिवनगर येथे जिल्हा परिषद हाउसिंग सोसायटीमधील पालिका इमारतीमध्ये ओपीडी सुरू केली असून, या माध्यमांद्वारे लोकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यापुढे जाऊन पालिकेने दिल्ली सरकारने सुरू केलेल्या मोहल्ला क्‍लिनिकप्रमाणे प्रभाग क्‍लिनिक सुरू करण्याची संकल्पना हाती घेतली आहे. 

...यांनी दिले योगदान 

प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, कऱ्हाड तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, आरोग्यसेविका सुलोचना पावणे, ए. एस. भोसले, आर. एस. पाथरवट, तलाठी सचिन निकम, पोलिस पाटील प्रशांत गावडे, धनंजय येडगे, सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, कृष्णा रुग्णालय, सह्याद्री हॉस्पिटल, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलिस प्रशासन यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना आयुर्वेदिक काढा व गोळ्या 21 दिवस दिल्या जात होत्या. यामध्ये पंचवेद आयर्वेद क्‍लिनिक, कऱ्हाडचे डॉ. वैद्य मिहीर वाचासुंदर व डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. उज्वला नांगरे, मायाक्कादेवी देवस्थान ट्रस्ट, सुखायु क्‍लिनिक यांनी मदत केली आहे. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे शहर कोरोनामुक्त झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com