Satara : पाटण सोसायटीमध्ये तुल्यबळ लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank

Satara : पाटण सोसायटीमध्ये तुल्यबळ लढत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी आम्हाला शब्द देऊनही सर्वसमावेशक पॅनेलमध्ये जिल्ह्यातील नेत्यांनी समाविष्ट करून घेतलेले नाही. ही बाब शिवसेनेने गांभीर्याने घेतली असून, आम्ही हे सर्व पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार आहे; पण जिल्हा बॅंकेत नको त्या पक्षाशी युती करत शिवसेना व काँग्रेसला बाजूला ठेवण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे; पण आम्ही आमच्या शिवसेनेच्या ताकदीवर जिल्हा बॅंकेत निवडून येऊ. जिंकण्यासाठीच आम्ही जिल्हा बॅंकेच्या रिंगणात उतरलो आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसार्इ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

पाटण सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे सत्यजितसिंह पाटणकर विरुद्ध गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई अशी लढत होत आहे. पाटण तालुक्यातील ही पाटणकर व देसाई घराण्यातील पारंपरिक लढत आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी गृहराज्यमंत्री देसाई यांच्याकडून या निवडणुकीबाबतची नेमकी भूमिका जाणून घेतली. गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असून, तीन पक्ष एकत्रित काम करत आहेत. सहकारात राजकारण नसते हे मलाही माहीत आहे. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे; पण शिवसेना व काँग्रेसला सामावून घेऊन सामंजस्याने एकत्रित निवडणूक करावी, अशी अपेक्षा होती.

तसे काही संकेतही राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून मिळाले होते. अर्ज माघार घ्यायच्या एक ते दोन दिवस आधी आम्हाला राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून कसलीही विचारणा झाली नाही, तसेच काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा केलेली नाही.’’ ज्यांना त्यांनी पॅनेलमध्ये घेऊन काही जागा बिनविरोध केल्या ते कसे चालते, असा प्रश्न उपस्थित करून मंत्री देसाई म्हणाले, ‘‘जे दोन पक्ष सरकारमध्ये आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा न करणे, विश्वासातही घेतले जात नाही. आमच्यासाठी एकही जागा सोडली नाही. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत. आमदार महेश शिंदे यांनीही उमेदवार दिला आहे. आम्ही आता पूर्ण ताकदीने आमच्या उमेदवारांच्या विजयासाठी संयुक्त प्रयत्न करत आहोत.’’

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जो अनुभव आम्हाला आला. तो लक्षात घेऊन आम्ही हा सर्व प्रकार शिवसेना पक्ष प्रमुखांच्या कानावर घालणार आहे. सध्या त्यांची तब्येत ठिक नाही, त्यामुळे आम्ही थांबलो आहोत. यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वत:च्या ताकदीवर व चिन्हावर लढणार आहे. राष्ट्रवादीने कितीही डावलले तरी जिल्हा बॅंकेत शिवसेनेचा निश्चित प्रवेश होणार आहे. आमचे बॅंकेत बहुमत नसले, तरी लोकशाही मार्गाने आम्ही सर्व ताकद लावून ही निवडणूक जिंकू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बॅंकेत शिवसेनेचा संचालक दिसेल

पाटण सोसायटी मतदारसंघाविषयी बोलताना गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘पारंपरिक लढत असली, तरी आम्ही जिंकण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. येथे आमची सर्व तयारी केलेली आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढून जिल्हा बॅंकेत शिवसेनेचा संचालक दिसेल.’’

विरोधकांकडून पैसा किंवा सत्तेचा वापर

पाटण सोसायटी मतदारसंघात विरोधकांकडून पैसा किंवा सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, पाटण तालुक्यातील सोसायटींचे प्रतिनिधित्व करणारे जे मतदार आहेत. ते पैशापुढे आणि सत्तेच्या ताकदीपुढे कधीही झुकणार नाहीत. सर्वसामान्यांची ताकद या निवडणुकीत त्यांना दिसून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

पाटण सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधून सत्यजितसिंह पाटणकर हे निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून नेमकी काय भूमिका राहणार याविषयी ‘सकाळ’ने त्यांच्याकडून जाणून घेतले. श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेत पाटण सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आला आहे. यापुढेही हीच परंपरा पुढे चालत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आजपर्यंत आम्ही जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या आहेत.

काही नवीन योजना, तसेच शेती व्यवसायाला ताकद देण्यासाठी विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी सभासदांना मदत केली आहे. शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना ताकद देणे ही आमची या निवडणुकीमागची भूमिका आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी आम्ही लढा उभा केला आहे. आजपर्यंत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची विकासकामांची आणि शेतकऱ्यांना ताकद देण्याची परंपरा यापुढेही मी चालविणार आहे.’’

पाटण सोसायटी मतदारसंघात गृहराज्यमंत्र्यांचे आव्हान तुमच्यापुढे आहे, त्यांच्याकडे सत्तेची ताकद तर तुमच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मतांची ताकद आहे. त्यामुळे या लढतीकडे तुम्ही कसे पाहता, यावर श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘सहकारात काम करताना सहकारी सोसायटींचे बहुमत महत्त्वाचे आहे. आमच्याकडे पाटण तालुक्यातील सोसायटींचे बहुमत आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीत पैसा किंवा सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तरी पाटण तालुक्यातील सोसायटींचे प्रतिनिधित्व करणारे जे मतदार आहेत. ते पैशापुढे आणि सत्तेच्या ताकदीपुढे कधीही झुकणार नाहीत.’’ सर्वसामान्यांची ताकद या निवडणुकीत त्यांना दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

loading image
go to top